आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal\'s OSD Big Fish In Scam Rather Than Bribing Chikhlikar

लाचखोर चिखलीकरापेक्षा छगन भुजबळांचा ओएसडी मोठा मासा- सोमय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगून असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्यापेक्षा छगन भुजबळ यांचा ‘ओएसडी’(ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) संदीप बेडसे मोठा मासा आहे. चिखलीकर प्रकरणी त्याची चौकशी केल्यास या विभागातील मोठे रॅकेट उघडकीस येईल, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.


एलबीटीविरोधी आंदोलनासाठी आझाद मैदानावरती आले असता पत्रकारांशी बोलताना सोमय्यांनी हे आरोप केले. ते म्हणाले, की संदीप बेडसे या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांचा ‘ओएसडी’ आहे. भुजबळांचे बांधकाम विभागातील टक्केवारीचे सर्व व्यवहार बेडसेमार्फत होतात. चिखलीकर प्रकरणी या महाघोटाळेबाज बेडसेची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. रेल्वेमंत्री बन्सल यांच्या सचिवाची चौकशी होऊ शकते, मग भुजबळांच्या ओएसडीची का नाही? बेडसे याच्या पत्नीला आणि भावाला सार्वजनिक बांधकाम विभागाची कंत्राटे कशी काय मिळाली? कनिष्ठ अभियंता असणा-या संदीप बेडसेकडे बीएमडब्ल्यू मोटार कशी? असे सवाल सोमय्या यांनी उपस्थित केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक राज खिलनानी भुजबळ यांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच बेडसे याला चौकशीपासून अलिप्त ठेवले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.


हे घ्या चार ‘चिखलीकर’- चौबे या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याने 140 कोटी रुपयांची बोगस बिले मंजूर केली आहेत. रणजित हांडे या अभियंत्याची अनेक इंजनिअरिंग कॉलेज आहेत. शेलार या अभियंत्याकडे शंभर कोटींपेक्षा अधिक मालमत्ता आहे, तर रहाणे या अभियंत्याच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. या सर्वांची चौकशी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.


एसआयटी स्थापन करा- चिखलीकर प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक आहे. या विभागातील शेकडो चिखलकरांपर्यंत पोहोचायचे असेल तर या प्रकरणाच्या तपासकामी शासनाने ‘एसआयटी’ स्थापन करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.


माझ्या कार्यालयाचा संबंध नाही- गेल्या काही दिवसांपासून मला व सार्वजनिक बांधकाम विभागाला टार्गेट केले जात आहे. हे माझ्या हितशत्रूंचे कारस्थान आहे. शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप त्याचाच भाग आहे. सतीश चिखलीकर प्रकरणाशी माझ्या मंत्रालयातील कार्यालयाचा किंवा त्यामधील कोणा अधिका-याचा दुरान्वये संबंध नाही. छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री.