आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला भगदाड, मनसेला चाप, छगन भुजबळांचा आणखी एक समर्थक शिवसेनेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या आणखी एका कट्टर समर्थकाने मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून भुजबळांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा कुठल्या दिशेने असेल, याविषयी राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देणाऱ्या सुर्वेंनी मंगळवारी शिवबंधन हाती बांधल्यामुळे पक्षातूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीच्या उत्तर-पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुर्वे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या भागात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. जिल्हाध्यक्ष असलेल्या सुर्वेंनी भुजबळांच्या मदतीने आपल्याशिवाय येथे दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे नेतृत्वच तयार होऊ दिले नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी सातत्याने केला होता. मात्र भुजबळांच्या पाठिंब्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी सुर्वेंच्या मनमानीला आळा घातला नाही आणि त्याचा आजच्या घटकेला राष्ट्रवादीला मोठा फटका बसल्याचे वास्तव समोर आले आहे, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.
छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यरत असलेल्या समता परिषदेचे विदर्भातील प्रमुख नेते किशोर कान्हेरे तसेच भुजबळांचा मुंबईतील उजवा हात समजले जाणाऱ्या मंगेश बनसोड यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यापाठोपाठ आता सुर्वे आल्याने भुजबळांच्या माणसांचा शिवसेनेकडे ओघ वाढत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सोमवारी मुलाखत देतानाही सुर्वे यांनी मोठ्या संख्येने समर्थक आणत शक्तिप्रदर्शन केले होते. मंगळवारीही असंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुर्वेंनी बोरीवलीच्या मागठाणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
शिवसेनेने सुर्वे यांना प्रवेश देऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. बोरिवली, दहिसर हा परिसर खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर मागठाणे या मतदारसंघावर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे नेते प्रवीण दरेकर येथून आमदार झाले. त्यांनी हा मतदारसंघ घट्ट बांधला. त्यांना पराभूत करणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान होते. २००९ मध्ये शिवसेनेचा उमेदवार येथे तिसऱ्या क्रमांकावर घसरला होता. दरेकर यांच्यासमोर आजही तगडा उमेदवार शिवसेनेकडे नव्हता. मात्र सुर्वेंच्या प्रवेशाने दरेकरांविरोधात तगडा प्रतिस्पर्धी मिळालाच, शिवाय राष्ट्रवादीची उरलीसुरली ताकदही संपवण्यात शिवसेनेला यश आले.