आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागावलेल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टाळले, दिवाकर रावते, रामदास कदमांच्या कार्यक्रमांना दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जवळीक असल्याचे अाजवर दिसत हाेते. त्यामुळे दाेन्ही मित्रपक्षांत कितीही कटुता निर्माण झाली ठाकरेंशी अापले चांगले संबंध असल्याचे फडणवीस वारंवार सांगत असतात. मात्र, बुधवारी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली ती सहन न झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी ठाकरेंच्या उपस्थितीत अायाेजित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे युतीतील व या दाेन्ही नेत्यांतील संबंध टाेकाला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.   

शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी ग्रामीण भागासाठी शिव टॅक्सी सेवेचा शुभारंभ करण्याचा कार्यक्रम वांद्रे येथे आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेही उपस्थित राहाणार होते. यानंतर लगेचच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वांद्रे येथेच वायू प्रदूषण रोखणाऱ्या यंत्राच्या पायलट प्रोजेक्टचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमालाही हे दाेघे प्रमुख पाहुणे हाेते. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी दाेन्ही कार्यक्रमांकडे पाठ फिरवली.
  
भाजपमधील सूत्रांनी सांगितले, ‘शिवसेनेकडून अाजवर हाेणारी टीका अाम्ही सहन करत हाेताे. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांनी रोजच भाजप व माेदींवर टीकेची झाेड सुरू केली अाहे. त्यावरही वाद वाढवू नका, अशा सूचना मुख्यमंत्री वारंवार देत असत.  उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंधही आहेत. परंतु टीका सहन करण्यासही एक मर्यादा असते. ही मर्यादा ठाकरे यांनी अाता अाेलांडली अाहे. बुधवारी ठाकरेंनी माेदींची तुलना थेट चीनच्या हुकूमशहाशी केली, ते याेग्य नाही. यापूर्वी दिवाकर रावतेंनीही माेदींचा एकेरी उल्लेख केला हाेता. त्याचेच हे परिणाम अाहेत,’ याकडेही भाजपच्या नेत्यांनी लक्ष वेधले.  

‘जाणारच नव्हते’
फडणवीसांच्या अनुपस्थितीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘मुख्यमंत्री या दोन्ही कार्यक्रमांना जाणारच नव्हते. संबंधित मंत्र्यांनी स्वतःहूनच मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या यादीत हे कार्यक्रम नसल्याने ते गेले नाहीत,’ अशी सारवासारव करण्यात अाली. तर शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, ‘मंत्री स्वतःहून मुख्यमंत्र्यांचे नाव कसे जाहीर करतील?  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, त्यांची वेळ घेऊनच कार्यक्रम जाहीर केला होता. मुख्यमंत्री का आले नाहीत, हे त्यांनाच ठाऊक; परंतु त्यांना न विचारता कार्यक्रम आयोजित केला नव्हता हे तितकेच खरे आहे.’
बातम्या आणखी आहेत...