आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, मानव यांनी केली कारवाईची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. ‘सनातन संस्थेचा केवळ पानसरे किंवा दाभोलकांच्या हत्येपुरता संबंध तपासून चालणार नाही तर आश्रमांवर छापे टाकून त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहितीच उजेडात आणायला हवी,’ अशी अपेक्षा मानव यांनी व्यक्त केली.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणारे पोलिस महानिरीक्षक संजीव कुमार यांना फोनवरून मानव यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याचे आदेश दिले. मानव यांनाही त्यांची भेट घेण्यास सुचविले आहे. समीर गायकवाडच्या अटकेनंतर मारेकरी सापडण्याची पोलिसांना आशा असली तरी मानव यांना मात्र ती खोटी वाटते. ‘समीरचे मैत्रिणीशी बोलताना पोलिसांनी केलेले रेकॉर्डिंग न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर सर्व साधकांची चौकशी करून पुरावे गोळा करावेत’, असे मानव यांनी सांगितले. दै. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीतही मानव यांनी ही भीती व्यक्त केली होती. सनातनचे संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांनी साधकांचा मेंदू साधनेतून ताब्यात घेतला आहे. त्यांनी साधकांना ‘मानवी रोबो’ बनवले आहे.
ज्याप्रमाणे संगणकाला ‘कमांड’ दिल्यास तो आपले काम चोख बजावतो, तसेच साधकांकडून ‘सनातन’ कोणतेही काम करून घेते. त्यामुळे पानसरे हत्येचा नेहमीच्या पद्धतीने तपास करून चालणार नाही. दाभोलकराच्या हत्येनंतर मी तत्कालिन गृहमंत्र्यांना हे सांगितले होते. कदाचित पोलिसांनी सनातनच्या कार्यालयापर्यंत त्याचवेळी पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तर पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या रोखत्या आल्या असत्या’, याकडेही मानव यांनी
लक्ष वेधले.

मुख्यमंत्री झाले स्तब्ध
श्याम मानव यांनी सुमारे अर्धा तास सनातनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली, ते ऐकून मुख्यमंत्री स्तब्ध झाले. ‘विचार संपवण्यासाठी थेट विचारवंतांची हत्या करण्याची ही पद्धत दहशतवाद्यांपेक्षा गंभीर रूप घेऊ शकते. अशा कार्यपद्धतीमुळे उद्या महाराष्ट्रात अफगाण किंवा पाकिस्तानसारखी परिस्थिती उद‌्भवण्याचा धोका नाकारता येणार नाही. कदाचित सनातनच्या पुढच्या हत्येचे लक्ष्य मानवही असू शकतील, असेही मानव यांनी सांगितले.