आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरॅकल ओपन वर्ल्डमध्ये मुख्यमंत्री मांडणार विचार, जाणार सॅन फ्रान्सिस्को दौऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती तंत्रज्ञानात होणाऱ्या आधुनिक बदलांची माहिती व्हावी यासाठी कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे ओरॅकलतर्फे दरवर्षी ओपन वर्ल्ड कॉन्फरन्स आयोजित करण्यात येते. आयबीएम, जावा, अॅपल, मायक्रोसॉफ्ट अशा दिग्गज कंपन्यांचे सीईओ आणि अधिकारी या कॉन्फरन्समध्ये भाग घेऊन आपले विचार मांडतात. या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभाग घेणार असून मुख्य भाषणही देणार आहेत. कॉन्फरन्समध्ये भाषण देणारे फडणवीस हे पहिले राजकीय व्यक्ती आहेत.

दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात कॉन्फरन्समध्ये भाग घेण्याबरोबरच अनेक कंपन्यांशी चर्चा आणि एमओयूही साइन केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार या कॉन्फरन्ससाठी मुख्यमंत्र्यांसह आयटी सचिव विजयकुमार गौतम आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे जाणार आहेत. राज्यातील शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकारने विशेष योजना तयार केली आहे. नागपूरमधील जपानीज गार्डनपासूनच्या सहा किलोमीटर भागात पायलट तत्त्वावर स्मार्ट सिटीचे काम केले जाणार आहे.

इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर करून शहरे स्मार्ट करता येतात. ओरॅकल क्लाऊड कम्प्युटिंगपासून अनेक गोष्टींपर्यंत स्मार्ट सिटीसाठी खूप मदत करू शकते. यासाठी ओरॅकलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून या कॉन्फरन्समध्ये ओरॅकलबरोबर करार केला जाणार आहे.

केवळ ओरॅकलच नव्हे तर मेक इन इंडियामध्ये सहभागी झालेल्या काही कंपन्यांबरोबर पुन्हा एकदा मुख्यमंत्री चर्चा करणार असून दोन-तीन कंपन्यांबरोबर एमओयू केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बैठक टेस्ला कंपनीबरोबर आहे. जगात ड्राइव्हरविरहित गाड्या पुरवण्यात टेस्ला कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. काही देशांमध्ये ड्राइव्हरविरहित गाड्या सध्या चालवल्या जात आहेत. उबेरने अमेरिकेत अशी टॅक्सी सेवा सुरू केली आहे. राज्यात अशी सेवा सुरू करता येईल का, त्यात काय अडचणी येऊ शकतात आदी विषयांवर टेस्लाच्या अधिकाऱ्यांशीही मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.
स्मार्ट सिटी म्हणजे काय?
स्मार्ट सिटी म्हणजे फक्त सीसीटीव्ही लावणे नव्हे. स्मार्ट सिटीमध्ये ट्रॅफिक सिग्नल, रस्त्यावरील दिवे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पार्किंगसह एन्व्हायर्नमेंटल केंद्र उभारणे म्हणजे स्मार्ट सिटी. रस्त्यावर असलेल्या कचऱ्याच्या डब्यात ७० टक्के कचरा भरला की लगेच मुख्य केंद्राकडे संदेश जाणार आणि कचऱ्याचा डबा रिकामा केला जाणार, रस्त्यावरील लाइट सूर्यप्रकाशानुसार बंद-चालू होणार, पार्किंगसाठी कुठे जागा उपलब्ध आहे, वातावरणात धुळीचे प्रमाण किती आदी माहिती तेथील नागरिकांना उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी शहराच्या नावाने मोबाइल अॅपही तयार केले जाणार असून यावर ही सर्व माहिती मिळेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...