आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाश्वासनांवरच बाेळवण; शेतकरी संपावर ठाम, ‘वर्षा’वरील बैठक निष्फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी/ मुंबई - कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे अांदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री ‘वर्षा’वर चर्चा केली. अामचे सरकार शेतकऱ्यांबाबत सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार करतानाच  मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमाेर अनेक याेजनांची जंत्रीच मांडली. तसेच संप न करण्याचे अावाहन करत या प्रतिनिधींची अाश्वासनांवर बाेळवण केली.  मात्र कर्जमाफीबाबत काहीच अाश्वासन न मिळाल्याने  अखेर संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.
किसान क्रांती संघटनेसह अन्य काही संघटनांनी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात एक जूनपासून शेतकरी संपावर जाण्याचा इशारा दिला अाहे. याच मागणीसाठी पुणतांबा येथे अांदाेलनही सुरू अाहे. कृषी राज्यमंत्री सदाशिव खाेत यांनी मंगळवारी या गावात जाऊन अांदाेलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चेच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अाग्रही हाेते. त्यानुसार खाेत या शेतकरी प्रतिनिधींना थेट मुंबईत ‘वर्षा’वर घेऊन गेले. तिथे खाेत यांच्यासमक्ष मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधींशी चर्चा केली.  
 
‘शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे, कल्पनेचे, मार्गदर्शनाचे स्वागतच आहे. शेतकरी कर्जबाजारी होण्याचे मुख्य कारण हे कमी उत्पादकता, वीज न मिळणे, सिंचन सुविधा कमी असणे हे आहे. या सर्व बाबतीत मोठी कामगिरी दोन वर्षांत सरकारने केली अाहे. अजूनही प्रयत्न सुरूच अाहेत. शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक हाेत आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचन सुविधा, वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. एनडीडीबीच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये काम सुरू झाले, तेथे शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ४ रुपये जादा मिळत आहेत. दुधाचा राज्याचा स्वत:चा ब्रँड विकसित करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे.  शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी अन्नप्रक्रिया, शेतमाल प्रक्रिया आदींसाठी पुढाकार घेतला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील धाेरणही मंजूर झाले अाहे.  माफक दरात शेतकऱ्यांना वीज मिळावी म्हणून सौर फीडरसंदर्भातील निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. १२ तास वीज देण्याचा प्रयत्न यातून हाेईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा’, असे अावाहन मुख्यमंत्र्यांनी अांदाेलक शेतकऱ्यांना केले.
 
संपाने सरकारला फरक पडत नाही : भंडारी  
पंढरपूर -  संपाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्यांशी सरकार वाटाघाटी करत असताना सत्ताधारी भाजपचे प्रवक्ते मात्र अाम्हाला शेतकऱ्यांच्या संपाने फरक पडत नसल्याचे सांगत अाहेत. ‘कोणत्याही शेतकऱ्यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही त्यांनी संप केलाच तर सरकारला काहीही फरक पडणार नाही’, असे उद्दाम मत माधव भंडारी यांनी मंगळवारी पंढरपुरात व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...