मुंबई - दावोस (स्वित्झर्लंड) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४५ व्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी सहकार्य करण्यासाठी या उद्याेग समूहाला साकडे घालण्यात अाले.
परिषदेच्या पहिल्या सत्रात फडणवीस यांनी नोमुरा या वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या समूहाचे अध्यक्ष मिनोरू शिनोहारा तसेच या समूहाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी विकास शर्मा यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तसेच राज्यातील विकसित होणा-या शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या समूहाचे सहकार्य घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चाचपणी केली.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी या चर्चेत सहभागी झाले हाेते. इतरही उद्योग समूहांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. त्यात जनरल इलेक्ट्रिक, नेस्ले, ह्योसंग, पेप्सिको, लॉरियल, इस्पात, जेट्रो, डब्ल्यूईएफ, मित्सुई, नोवार्टिस, सॅफ्रन, कॉग्निझंट आदी उद्योग समूहांचा समावेश आहे. दरम्यान, या परिषदेसाठी मुख्यमंत्री काही वरिष्ठ अधिका-यांसह बुधवारी पहाटे स्वित्झर्लंडकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री या परिषदेदरम्यान अनेक प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असून परिषदेत सहभागी होत असलेल्या विविध जागतिक उद्योग समुहांच्या प्रमुखांचीही राज्याचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. विविध उद्योगांसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यासह राज्यातील प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे सहकार्य घेण्याबाबतही प्रयत्न केले जातील. त्यासोबतच महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.
‘न्यू ग्लोबल कंटेक्स्ट’ हे यंदाच्या परिषदेचे सूत्र आहे. यंदाच्या वार्षिक बैठकीत सुरक्षा, स्थैर्य, विविध क्षेत्रातील सहकार्य यासह आर्थिक विकासाशी संबंधित विविध बाबींवर मंथन होणार आहे.