मुंबई - गेल्या तीन वर्षांत राज्यात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचे प्रगतिपुस्तक राहुल गांधींना दाखवण्याबरोबरच इतर मंत्र्यांचेही प्रगतिपुस्तक त्यांच्या नजरेस मुख्यमंत्र्यांनी आणल्याची माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळात जानेवारी महिन्यात फेरबदल केला जाईल, असेही बोलले जात आहे.
चार राज्यांत झालेल्या अपयशासारखे अपयश अन्य राज्यांसह महाराष्ट्रात पदरी पडू नये म्हणून काँग्रेसने दिल्लीत आत्मचिंतन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे प्रगतिपुस्तक मागवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीची, सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती राहुल गांधी यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी केवळ आपलेच प्रगतिपुस्तक मांडले असे नाही तर काँग्रेसच्या मंत्र्यांचेही प्रगतिपुस्तक त्यांच्यासमोर उघडले.
मुख्यमंत्र्यांनी गेल्या एक वर्षापासून राज्यातील सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यात मंत्र्यांना देण्यात आलेला निधी, त्यांनी राबवलेल्या योजना आणि सुरूकरण्यात येणा-या योजनांची माहिती होती. काँग्रेस मंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती राहुल गांधी यांना मुख्यमंत्र्यांनी दिली तसेच प्रत्येक मंत्र्याबाबत आपले मतही नोंदवले.