आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप भांडवल करेल म्हणून देसाईंनी देऊ केला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राजीनामे फेटाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसआरए प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा दिला. अर्थातच मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला. भाजप याचे भांडवल करेल हे लक्षात आल्यावर शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनीही शनिवारी वर्षा बंगल्यावर जाऊन सकाळी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांचाही राजीनामा फेटाळला.

काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ६०० एकर जमीन संपादित झाली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी ४०० एकर जमीन सुभाष देसाई यांनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप करीत विरोधकांनी देसाईंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मेहता यांच्याही राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

अगोदर उद्धव-देसाई, नंतर उद्धव-सीएम चर्चा
देसाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून राजीनाम्याबाबत शुक्रवारी रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केली व राजीनामा फेटाळला. चौकशीस तयार असून जो निर्णय होईल तो मान्य असेल असेही देसाई म्हणाले.

आमचीही स्वच्छ प्रतिमा!
मेहता व देसाईंंच्या राजीनामा नाट्यातून शिवसेनेची भाजपशी बरोबरी करून प्रतिमा जपण्याचा प्रयत्न उघड झाला. मेहतांचा राजीनामा फेटाळल्याचे कळताच शनिवारी देसाईंनाही राजीनामा देण्यास सांगितले असावे व नियोजनपूर्वक तो फेटाळला जावा याची आखणीही अगोदरच केली असावी, अशी चर्चा रंगली आहे.

देसाईंचा राजीनामा नाकारून मेहतांनाही वाचवले
देसाईंचा राजीनामा नाकारून मुख्यमंत्र्यांनी मेहतांनाही वाचवले आहे. हे मंत्री पदावर असताना नि:पक्ष चौकशी कशी होणार? राजीनामे घेऊनच चौकशी व्हायला हवी. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...