आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Should Not Take Black Money, Ramdas Kadam Attacking On Fadnavis

मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेऊ नयेत, पर्यावरणमंत्री कदम यांची फडणवीसांवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाइलाजाने का होईना शिवसेना-भाजप हे मित्रपक्ष सत्तेत एकत्र आले असले तरी त्यांची
मने मात्र अद्याप जुळलेली दिसत नाहीत. गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आम्हीच सरकार स्थिर केले’ असा दावा करत भाजपच्या डोक्यावर हात ठेवला, तर दुसरीकडे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेऊ नयेत,’ असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. शिवसेना नेत्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी समाचार घेतला.
‘कदम यांची वक्तव्ये मनोरंजन करणारी असतात,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ‘राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता नाही. आम्ही केवळ सरकार स्थिर केले आहे. सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्यास सरकारची प्रशंसा करू. मात्र, मराठी माणसांवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरून सरकारशी संघर्षही करू,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला होता. ‘कोणाला कसे बाळकडू द्यायचे हे शिवसेनेला चांगले माहीत आहे,’ असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला होता.
त्यापाठोपाठ पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ‘बाळकडू’ चित्रपटातील दृश्याचा संदर्भ
देत ‘मराठी माणसाला स्वस्तात घरे दिली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेऊन बिल्डरांना फ्लॅट देण्यापेक्षा मराठी माणसांना स्वस्तात घरे द्यावीत,’ असे आवाहन करत आगीत तेल ओतले. त्यामुळे भाजपमधून संताप व्यक्त होत आहे.
'कदमांचे वक्तव्य मनोरंजक'
शिवसेना नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, ‘सरकार स्थिर ठेवायचा हेतू असता तर बाहेरून पाठिंबा दिला असता तरी चालले असते. त्यासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याची गरज काय?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ‘रामदास कदम यांचे वक्तव्य आम्ही गंभीरपणे घेत नाही. त्यांची वक्तव्ये मनोरंजन करणारी असतात. सत्तेत सहभागी असूनही मुख्यमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही. मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर याबाबत शिवसेनेशी चर्चा केली जाईल,’ असेही खडसेंनी स्पष्ट केले. दरम्यान, यानंतर कदम यांनी घूमजाव करीत, मुख्यमंत्र्यांवर टीका केली नसल्याचे स्पष्ट केले.
'एलईडीमुळे शान गेली'
मरीन ड्राइव्हवर एलईडी दिवे बसवण्यात आल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एलईडीमुळे मरीन ड्राइव्हची शान गेल्याचे ट्विट गुरुवारी रात्री केले. त्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टि्वटद्वारेच उत्तर देत एलईडीमुळे वीज बिल कमी येणार असून सरकारचा फायदा होणार आहे. तसेच चांगल्या उजेडामुळे महिलांना सुरक्षित वाटेल आणि नवीन तंत्रज्ञानामुळे संपूर्ण वर्षभर मरीन ड्राइव्ह उजळून निघेल,’ असे प्रत्त्युत्तर दिले होते. त्यापूर्वी मिठी नदी स्वच्छतेवरूनही भाजपने शिवसेनेवर ‘करून दाखवलेले दिसले नाही’ अशी बोचरी टीका केली होती. रामदास कदम यांनी मिठी नदीचा दौरा केल्यानंतर अधिका-यांना केलेल्या सूचनेवर भाजपने ही टीका केली होती.
मोफत चित्रपट अन‌् खाद्यपदार्थ
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित तयार केलेल्या ‘बाळकडू’ चित्रपटाचे मोफत शो शिवसेनेतर्फे मुंबईत आयोजित केले होते. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांसाठी मोफत खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

शिवाजी पार्कवर अखंड ज्योत
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शुक्रवारपासून अखंड ज्योत तेवत राहणार आहे. पुढच्या पिढीला ही ज्योत प्रेरणा देईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महानगर गॅस आणि भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने ज्योत उभारली आहे.
शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्यात शरद पोंक्षे यांनी ‘सावरकर ते
बाळासाहेब - दोन हिंदुहृदयसम्राट’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यांच्या वक्तव्याला
शिवसैनिकांनी उत्स्फूर्त दाद देत शिवसेनाप्रमुखांचा जयजयकार केला.