आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. महाराष्ट्रानेच लाटली कर्जमाफी- मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेले अाठवडाभर सरकारला वेठीस धरणाऱ्या काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी विधानसभेत चांगलीच खरडपट्टी काढली. ‘तुमच्या सरकारने यापूर्वी दिलेल्या कर्जमाफीचा मराठवाडा, विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रानेच फायदा लाटला,’ असा अाराेप करताना फडणवीस यांनी अाघाडी सरकारच्या कारभाराचे वस्त्रहरणच केले. या टीकेपुढे निरुत्तर झालेल्या विराेधकांनी कर्जमाफी घोषित न झाल्याचा निषेध करीत सभात्याग करून स्वत:ची सुटका करून घेतली.

मुख्यमंत्र्यांचे मॅरेथान भाषण तब्बल दोन तास चालले. सुरूवातीपासूनच आक्रमक असलेल्या फडणवीस यांनी विरोधकांचे पितळच उघडे पाडले. ‘यूपीए सरकारने २००८ आणि २००९ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना एकूण ६ हजार ९११ कोटींचे कर्जमाफी दिली. खरेतर विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत्या आणि त्यानंतर मराठवाड्यातही आत्महत्या होत्या. यामुळे या पॅकेजचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळायला हवा होता. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ ११८८ कोटी म्हणजे एकूण रकमेच्या १७ टक्के, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १ हजार ५८५ कोटी तर पश्चिम महाराष्ट्राला ५३ टक्के लाभ मिळाला. कर्जमाफीचे पॅकेज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी होते. मग पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक लाभ कसा मिळाला? या कर्जमाफीबद्दल कॅगने अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. अपात्र व्यक्ती, संस्थांना कर्ज माफी देणे, कर्जाबाबत खोडतोड, कर्ज दिले नसताना दिल्याचे दाखवून कर्जमाफी देणे, व्याजाच्या रकमा माफ करणे, फूल उत्पादकांना कर्ज माफी देणे, असे गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत, '' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.

“कर्जमाफीची मागणी विरोधक करीत आहेत. मात्र यात विदर्भ-मराठवाड्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? सध्या विदर्भात २९ लाख तर मराठवाड्यात ३१ लाख असे एकूण ६० लाख खातेदार शेतकरी आहेत. विदर्भात आजवर केवळ १० लाख तर मराठवाड्यात १५ लाख असे २५ लाख खातेदारांनाच कर्ज मिळाले आहे. याचा अर्थ ३५ लाख शेतकरी हे कर्ज वाटपाच्या व्याप्तीच्या बाहेरच आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील ६० लाखांपैकी ३५ लाख म्हणजे ६० टक्के शेतकऱ्यांना कर्जच आजवर कधीही मिळाले नसल्याने २००८ व ०९ च्या कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळाला?,'' अशा प्रश्नांचा भडिमार फडणवीस यांनी केला.
“कर्जमाफीनंतरही २००९ मध्ये १ हजार ६०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २००९-१४ या काळात ९ हजार ६१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? कर्जमाफी झाल्यानंतर अवघ्या सहा वर्षात पुन्हा शेतकरी कर्जबाजारी का झाले? महाराष्ट्रात १९९४ साली ज्या प्रमाणात सिंचन सुविधा होत्या त्याच प्रमाणात सुविधा १५ वर्ष सत्तेत राहून तुम्ही दूर करू शकला नाहीत. सिंचनाचा अनुशेष तसाच राहिला. विदर्भ मराठवाड्यातील १८ हजार शेतकऱ्यांच्या शेतात धडक विहिर कार्यक्रमातून विहिरी बांधून देण्याचा कार्यक्रम तुम्ही अंमलात आणला नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. या पैकी बहुसंख्य आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेले शेतकरी होते,'' अशी टीका त्यांनी केली.

मीही पाच पिढ्यांचा शेतकरी
सूतगिरण्या उभारण्यासाठी दिलेले पैसे विरोधी नेत्यांनी २५ वर्षांसाठी बँकेत ठेवून त्यावरचे व्याज खाल्ले. व्याज खाण्यासाठी पैसे दिले होते की, सूतगिरणी चालवायला दिले होते, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंचे नाव घेतले. मी पाच पिढ्यांचा शेतकरी आहे. वजनामुळे मला खाली बसता येत नाही. पण कधी माझ्याबरोबर चला गाय दोहून दाखवतो. तुमच्या इतके नसले तरी शेतीतले कळते असा टोला अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या सडेतोड भाषणाच्यावेळी विरोधी बाकावरही अस्वस्थता होती.
आर्थिक शिस्त नाही : पवार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तीनच महिने उलटत नाहीत तोवर पावसाळी अधिवेशनात १४,७९३ कोटींच्या खर्चाच्या पुरवणी मागण्या येतातच कशा?, असा सवाल करत अजित पवार यांनी या सरकारला आर्थिक शिस्त राहिली नसल्याचा आरोप करत सरकारवर तीव्र टीकास्त्र सोडले. या मागण्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याला २ हजार ४११ कोटी रु.ची मागणी करत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वाट्याला मात्र काहीच आले नसल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी शिवसेनेच्या असंतोषालाही फुंकर घातली.

अजित पवारांवर थेट हल्ला
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. "वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी इन्फ्रा टू प्रकल्प आखण्यात आला. यात विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी केलेल्या तरतुदीपेक्षा अधिक अशी १०५४ कोटी रक्कम एकट्या बारामतीसाठी केली. बारामती म्हणजे महाराष्ट्र याची मला कल्पना आहे, '' असा टोलाही लगावला. विदर्भ-मराठवाड्यातील ९३ हजार शेतकऱ्यांनी वीज पंपासाठी डिमांड भरल्या. पण पैसे जमा केल्यानंतरही ३३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज तीन वर्षे प्रलंबित अाहेत. अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढविला. ‘बारामती दुग्ध संघ शेतकऱ्यांना प्रति लिटर १७.५० रूपये भाव देते, मात्र डायनामिक डेअरीला हे दूध २० रूपये लिटरने विकले जाते. ही डेअरी मुंबईत हेच दूध ७० रूपये लिटरने विकते. इतकी नफेखोरी करण्यापेक्षा हा नफा शेतकऱ्यांना का दिला जात नाही? राजू शेट्टी हे २३ .५० रूपये भाव देत असून त्यांचा संघ सलग तीन वर्षे नफ्यात कसा?’ अशा शब्दात त्यांनी पवारांचे वस्त्रहरण केले.
बातम्या आणखी आहेत...