आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमता नसलेल्या संस्थेला १२३ कोटींचे चिक्की कंत्राट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मंत्री पंकजा मुंडेंच्या महिला व बालकल्याण विभागातील २०६ कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपात सर्वाधिक वादाचा विषय ठरला आहे तो सूर्यकांता महिला संस्थेला विना निविदा १२३ काेटींचे चिक्कीचे कंत्राट देण्याचा. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे गावच्या या छोट्याशा संस्थेची रोज ५ टन चिक्की निर्मितीची क्षमता नसतानाही त्यांना सुमारे दोन हजार टन चिक्की पुरविण्याचे हे कंत्राट विनानिविदा दिल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

वेतोरे गावात अवघ्या १५०० चौरस फुटाच्या जागेत सूर्यकांताचे चिक्की युनिट असून त्याची उत्पादन क्षमता अतिशय मर्यादित आहे. सरकारचे कंत्राट मिळवून ही संस्था बाहेरून उत्पादन तयार करून घेत आहे आणि हा प्रकार २०१२ पासून सुरू आहे. राज्यात लोणावळा परिसरात अनेक मान्यताप्राप्त व विश्वासार्ह चिक्की निर्माते असताना त्यांना निविदा प्रक्रियेद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चिक्की पुरविण्याच्या स्पर्धेत उतरण्याची संधी देण्यात आली नाही.

‘सूर्यकांता’ची स्थापना २००५ साली झाली आणि फळांवर प्रक्रिया करून त्याचे उत्पादन करणारी महिला संस्था अशी तिची ओळख होती. २००८ पासून या संस्थेने मायक्रो न्यूट्रीन तसेच राजगीरा चिक्कीचे उत्पादन करायला सुरूवात केली. कुपोषणावर उपाय म्हणून सरकारने शेंगदाणा, गुळाचे मिश्रण असलेल्या मायक्रो न्यूट्रीनची चिक्की अंगणवाड्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला आणि ती बनवण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सूर्यकांताला २०१२ पासून सरकारची कंत्राटे मिळण्यास सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या २० लाखांच्या कंत्राटापासून ते सरकारच्या २ कोटींपर्यंतच्या आॅर्डर संस्थेला मिळाल्या.

सूर्यकांताला चिक्कीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र असले तरी त्या प्रमाणानुसार चिक्की बनवली जाते, ही सुद्धा शंका या संस्थेकडील उपलब्ध साधनसामुग्रीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित करण्यात येत आहे. सध्याची या संस्थेच्या फॅक्टरची स्थिती पाहता त्यांना मदत करणारे बॅकअप युनिट असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही संस्था चिक्की बनवूच शकत नाही, हे उघड सत्य आहे. ओरस येथील सिंधुदुर्ग महिला भवनमधील युनीट हे सूर्यकांतापेक्षा कितीतरी मोठ्या क्षमतेचे असून हे युनीट बॅकअप म्हणून वापरले जात असावे, असे बोलले जाते.

सूर्यकांता पाटील यांचे नावाने चिक्की
वेंगुर्ल्यात कॅम्प परिसरात महिला काथ्या कामगार आैद्याेगिक संस्था १९८८ मध्ये स्थापन करण्यात आली. एम.के.गावडे हे या संस्थेचे मुख्य सल्लागार आणि प्रज्ञा परब यांनी पुढाकार घेऊन या संस्थेच्या छत्राखाली महिलांना संघटित केले. पुढे संस्थेचा व्याप वाढल्याने त्यांनी फळांवर प्रक्रिया करणारी संस्था काढण्याचा निर्णय २००५ मध्ये घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सूर्यकांता पाटील केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री होत्या. गावडे व परब हे दाेघे राष्ट्रवादीचे सिंध्ुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारी होते. सूर्यकांता यांनी मदतीचा हात दिल्याने संस्थेला त्याचे नाव देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न
करण्यात आला.

काँग्रेस- राष्ट्रवादीशी संबंधित संस्था
गावडे व परब हे मुळचे काँग्रेसचे पदाधिकारी. पण, नारायण राणेंशी पटत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. दोघांनाही चांगली पदे मिळाली. या पदाचा उपयोग करून ‘सूर्यकांता’चा व्याप वाढवण्यात आला. त्यावेळचे राष्ट्रवादीचे आमदार व आताचे शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्या मनमानीला कंटाळून दोघांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रज्ञा परब या सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.

चिक्की बेस्टच : गावडे
आमची चिक्की ही राज्यातील बेस्ट चिक्की आहे. आमच्या संस्थेची क्षमता, उपलब्ध जागा, पुरवठा मर्यादित असत्या तर आम्हाला एवढे मोठे सरकारी कंत्राट मिळालेच नसते. आम्ही उत्पादित केलेल्या चिक्कीवर आतापर्यंत एकही आक्षेप घेतला गेलेला नाही. आताही प्रयोगशाळेत नमुना तपासून पाहावा, असे मी आव्हान देताे. सरकारचे निकष पूर्ण करणारी अशी चिक्की इतर कुठेच बनत नसल्याने १२३ कोटींचे कंत्राट आम्हाला मिळाले आहे, अशी माहिती संस्थेचे सल्लागार एम.के.गावडे यांनी दिली.

राज्यात १९०९ टनांची मागणी
महिला व बालकल्याण विभागाच्या खरेदीत एकूण १ हजार ९०९ म्हणजे १९ लाख ९ हजार किलोंहून अधिक चिक्कीच्या खरेदीचे आदेश या संस्थेला प्राप्त झाले. वर्षातील ३६५ दिवस लक्षात घेतले तर या संस्थेच्या मांगरात रोज पाच टन चिक्की निर्माण करावी लागेल.

राेज पाच टन चिक्की उत्पादनाच्या क्षमतेबाबत शंका
घराच्या शेजारी सामान, जनावरे ठेवण्यासाठी एक मोठी खोली बांधलेली असते. त्याला काेकणात मांगर म्हणतात. वेताेर्‍यातही अशाच मांगरातच ही चिक्की फॅक्टरी सुरू आहे. वर्षभरात १२३ कोटींची आॅर्डर पूर्ण करण्यासाठी या संस्थेला दररोज ५ टन चिक्कीची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी दोन शिफ्टमध्ये २०० महिला कामगार काम करत आहेत, असा दावा या संस्थेचे सर्वेसर्वा एम.के. गावडे यांनी केला. मात्र प्रत्यक्षात तेथील जागेची व कामगारांची उपलब्धता पाहता असे मोठे युनिट तेथे नाही. सूर्यकांता ही अन्य फॅक्टर्‍यांमधून अशा आॅडर्स पूर्ण करयासाठी माल विकत घेते आणि तो आपण उत्पादित केला असे दाखवून सरकारला पुरवते, हे दिसून आले आहे.