आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे दोषी आढळल्या तर राजकारणातून संन्यास घेईन- महादेव जानकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माझी बहिण (मानलेली) पंकजा मुंडे ही जर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी आढळली तर मी राजकारणातून संन्यास घेईन अशी वल्गना 'रासप'चे महादेव जानकर यांनी मुंबईत केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई केली नाही तर राज्यातील जनता या सरकारला पुन्हा निवडून देणार नाही असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
महिला, बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील खोट्या आरोपांच्या निषेधार्थ व पंकजांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई-पुणेसह सर्वत्र निदर्शने करण्यात आली. पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मुंबईतील चेंबूर येथील पांजरपोळ सर्कलमधील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निदर्शनात सहभाग घेतला.
महादेव जानकर म्हणाले, पंकजा मुंडेंची बदनामी करण्यामागे कोण आहे हे सा-या जनतेला कळाले आहे. धनंजय मुंडे व अजित पवारांनी पंकजांच्या विरोधात नव्हे तर माझ्याविरोधात लढावे. मी त्यासाठी खंबीर आहे. पंकजा या भावी मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असल्यानेच त्यांच्या बदनामीचे षडयंत्र विरोधकांनी रचले आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी कोणताही भ्रष्ट्राचार केला नसल्याने ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत असे जानकर म्हणाले. जर पंकजा मुंडे दोषी आढळल्या तर मी राजकीय संन्यास घेईन असेही जानकर यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई केली नाही तर राज्यातील जनता या सरकारला पुन्हा निवडून देणार नाही असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
दरम्यान, मुंबई, पुणेसह जिल्हा आणि सर्व तालुक्यांच्या ठिकाणी राज्यभर रासप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला. तसेच धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला यावेळी कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला व त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. मुंबईत विलेपार्ले, बोरीवली येथेही निदर्शने करण्यात आली. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तर पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर, अनुसूचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब हंगारगे, डॉ उज्वला हाके, पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, बाळासाहेब कोळेकर, अंकुश देवडकर, सागर गोरे, रमेश पाटील, सुरज खोमणे, बाळासाहेब शिंदे, महादेव हरपळे उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्ष हा पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे. त्यांच्यावरील खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही. प्रतिमा हनन करण्यासाठी केलेलं हे षड्यंत्र यशस्वी होवू देणार नाही असे दीपक बिडकर यांनी सांगितले. डॉ उज्वला हाके, श्रद्धा भातंब्रेकर, बाळासाहेब कोळेकर, देवेंद्र धायगुडे यांचीही भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले.
बातम्या आणखी आहेत...