आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या काळात चिक्कीसाठी भाजप-सेनेचे लाॅबिंग, काँग्रेसकडून नवा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चिक्की घोटाळ्यात खुलासे समोर येत असताना नव- नवे आरोपही होत आहेत. २०१३ ला तत्कालीन आदिवासी मंत्री बबनराव पाचपुते यांनी ३७.०७ कोटींचे चिक्की कंत्राट सिंधुदुर्गमधील सूर्यकांता महिला सहकारी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला माजी आदिवासी राज्यमंत्री राजेंद्र गावित व त्यावेळच्या आयुक्त राधिका रस्तोगी यांनी जोरदार विरोध केल्याने हा निर्णय स्थगित करण्यात आला. याची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यावेळी विधान परिषदेत विरोधी पक्षांकडून भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. याचा अर्थ आघाडी सरकारच्या काळापासूनच चिक्की घोटाळ्यासाठी भाजप व शिवसेना लाॅबिंग करत असल्याचे दिसून येते, असा आरोप शनिवारी काँग्रेसकडून करण्यात आला.

पंकजा मुंडेंच्या महिला व बाल विकास विभागाने सूर्यकांता संस्थेला ११४ कोटींचे चिक्कीचे कंत्राट देण्याचा निर्णय फडणवीस सरकारला अडचणीत आणणारा ठरला आहे. काँग्रेसने या सार्‍या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवले आहे.

सूर्यकांता सहकारी संस्थेला ३० कोटींपेक्षा जास्त किमतीचे कंत्राट देण्याचा निर्णय पाचपुते यांनी घेतल्यानंतर गावित तसेच रस्तोगी यांनी जाेरदार विरोध केला. याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार, दिवाकर रावते, अरविंद सावंत, नागू गाणार या भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी सूर्यकांता संस्थेच्या बाजूने लाॅबिंग केले होते. या निर्णयाला स्थगिती का िदली, याची चौकशी झालीच पाहिजे, असा आवाज भाजप व सेनेच्या आमदारांनी उठवला होता.

पाचपुतेंवर संयशाची सुई, राष्ट्रवादीचाही गुंता
बबनराव पाचपुते यांनी सूर्यकांताच्या चिक्की कंत्राटाला मान्यता दिली होती. सूर्यकांता ही राष्ट्रवादीशी संबंधित संस्था असल्याने त्यांना हे कंत्राट द्यावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही असल्याने पाचपुते शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करत होते. यामुळे पाचपुतेंवरही संयशाची सुई आली आहे. सध्या पाचपुते भाजपमध्ये असल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चिक्की प्रकरणात मौन बाळगणे पसंत केले आहे.