आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चिक्की' विरोधकांच्याच अंगलट, १५ वर्षांच्या काळातील खरेदीची मुख्य सचिवांकडून चौकशी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या आताच्या खरेदीचीच नाही तर गेल्या १५ वर्षांपासूनच्या खरेदीची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी केली जाईल तसेच समितीत इतर दोन सचिवांचाही समावेश असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत जाहीर केले.

महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, आदिवासी विकास तसेच आरोग्य खात्यातील घोटाळ्याबाबत उपस्थित चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. जेथे खरेदी झालीच नाही तेथे १९१ कोटींची खरेदी केल्याचा आरोप झाला. जेथे तीन कोटींची खरेदी झाली तेथे १२५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला. तीन लाखांपेक्षा जास्तीची खरेदी ई-निविदेच्या माध्यमातून करावी, असा आदेश काढला. पण, दरकरारावरील खरेदी कायम राहिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तसे स्पष्ट केले होते. त्यांच्या काळात दरकरारांची मुदत ऑगस्ट २०१५ पर्यंत वाढविली गेल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी केला. खरेदी झालेली चिक्की दर्जेदार आहे, असा अहवाल राष्ट्रीय मानांकन असलेल्या प्रयोगशाळेने दिला आहे. तरीही या चिक्कीची तपासणी करायची असल्यास पुन्हा तपासणी करण्यास तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी खरेदी फक्त तीन ते चार कोटींची असताना त्यात १२५ कोटींचा घोटाळा कसा होईल, असा सवाल केला. विनोद तावडे म्हणाले, जी खरेदी झाली नाही. एकाही पैशाचे देयक दिले गेले नाही, त्याबद्दल १९१ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणे अनाकलनीय आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी औषधे खरेदीच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.