आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Growth Monitaring System Installing In Aganwadi, Adavasi Development Department Decision

अंगणवाडीत बसणार 'चाइल्ड ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टिम', आदिवासी विकास विभागाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना आखत असून त्याला ब-यापैकी यशही मिळत आहे. कुपोषणग्रस्त बालकांची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील अंगणवाड्यांमध्ये आता चाइल्ड ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टिम (सीजीएमएस) बसवण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या मशीन खरेदीसाठी लवकरच ई-निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


राज्यातील मुंबई, अमरावती, नंदूरबार, नाशिक, ठाणे जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य सरकार त्यांच्यासाठी अनेक योजना आखते, मात्र त्या संबंधितांपर्यंत पोहचतच नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच मुंबईच्या भरवस्तीत असलेल्या गोरेगावमधील आदिवासी पाड्यांवरही कुपोषणग्रस्त बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एका सर्वेक्षणानुसार राज्यात आजघडीला सुमारे दहा लाख कुपोषित बालके आहेत.


कुपोषित मुलांची संख्या, स्थान याची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी म्हणून आदिवासी विकास विभाग ‘सीजीएमएस’ मशिन प्रत्येक अंगणवाडीमध्ये बसविणार आहे. याबाबतचे सादरीकरण नुकतेच आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यापुढे झाले. ‘या मशीन्स अत्यंत उपयुक्त असल्याने त्यामुळे राज्यातील कुपोषणग्रस्त बालकांची माहिती मिळवणे सोपे जाणार आहे,’ असे पिचड यांनी सांगितले.


काय आहे ‘सीजीएसएम’ ?
चाइल्ड ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टिम म्हणजेच ‘सीजीएसएम’ ही मुलांचे वजन करणारी एक मशीन असून त्यात मुलाचे, वजन, उंची आणि जाडी एकाच वेळी नोंदली जाते. या मशीनवर वजन केलेल्या प्रत्येक मुलाला एक कोडनंबर दिला जातो. ही नोंद सहा वर्षांपर्यंत मशीनमध्ये राहते. अंगणवाडी सेविकेला जन्मतारीख आणि मुलगी, मुलगी अशी नोंद फक्त सुरुवातीलाच करावी लागते. त्यानंतर मशीनमधील डाटा कुपोषण निर्मूलनासाठी तयार करण्यात आलेल्या एका वेबसाइटवर टाकण्यात येतो. याद्वारे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती कुपोषणग्रस्त बालके आहेत याची माहिती प्राप्त होणार आहे.


विजेला सोलर चार्जरचा पर्याय
‘सीजीएसएम’ मशीनमध्ये तीन प्रकारे कुपोषणाची नोंद होते. यामध्ये वजन, उंची आणि जाडीनुसार बालक कोणत्या प्रकाराने कुपोषित आहे याची माहिती मिळते. अंगणवाड्यांमध्ये वीज नसल्याने या मशीनला सोलर चार्जरही देण्यात आलेला आहे. राज्यात सध्या धुळे आणि सोलापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात आहे. धुळे येथील फिनिक्स कंपनीने या मशीन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. गुजरात, छत्तीसगडमध्येही अशा प्रकारच्या मशीन्स मोठ्या प्रमाणावर बसवल्या असल्याची माहिती फिनिक्सच्या संचालकांनी दिली.