आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माता-पित्यांशी थेट संवादाची कैद्यांच्या मुलांना संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कैदेतील माता-पित्यांशी जाळीबाहेरून किंवा फोनद्वारे संवाद साधताना लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो, त्यांचे मानसिक संतुलन बिघडते, असे अभ्यासाअंती दिसून आले आहे. याचा विचार करून कारागृह प्रशासनाने १६ वर्षांखालील मुलांना कारागृहात त्यांच्या जन्मदात्यांशी समोरासमोर थेट संवाद साधण्याची साेय उपलब्ध करून दिली अाहे. सर्व कारागृहांना तसे आदेश देण्यात आले आहेत. मात्र १६ वर्षांवरील मुलांना नेहमीप्रमाणे भेटावे लागेल.

कारागृहात न्यायाधीन आणि सजाधीन असे दोन प्रकारचे कैदी असतात. खटले प्रलंबित असलेल्या न्यायाधीन कैद्यांना स्वतंत्र कारागृहात ठेवले जाते. तर शिक्षा ठोठावल्यांना कोल्हापूर, नाशिक, येरवडा, नागपूर येथे ठेवले जाते. न्यायाधीन कैद्याची प्रत्येक आठवड्याला नातेवाइकांना भेट घेता येते. तर सजाधीन कैद्यांना महिन्यातून दोनदाच भेटण्याची तरतूद आहे. आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहीण या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच कैद्याशी संवाद करण्याची संधी दिली जाते. फक्त २० मिनिटांचा कालावधी असला तरी बंदी बांधवांची संख्या जास्त असल्याने तितका वेळ एकमेकांची िवचारपूस करण्यासाठी मिळत नाही.

पूर्वी जाळीमधून भेट घेता येत होती. मात्र आता सर्व कारागृहात काच लावून फोनद्वारे बोलणे करून दिले जाते. पलीकडच्या बाजूला काचेतून बंदिस्त असलेल्या आई-वडिलांबरोबर त्यांच्या मुलांना बोलता येत नाही. आपल्या मनातील गोष्टी सांगता येत नाहीत. अनेकदा लहानग्या मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा लहानग्यांना जन्मदांत्यापासून दूर राहावे लागते.

न्यायाधीन कैद्यांसाठी आठवड्यातून दोन भेटी आहेत. त्याचबरोबर त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात येते. तेव्हा कुटुंबीय आणि आपल्या मुलांना त्यांना जवळून भेटता येते. काही वेळ गप्पा गोष्टी करता येतात. मात्र सजाधीन कैद्यांना बाहेर पडता येत
नाही. त्याचबरोबर मुलाखतीकरिता मर्यादा येतात. त्यामुळे ते कित्येक वर्षे आपल्या मुलांबरोबर संवाद साधत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ.भूषण कुमार उपाध्याय यांनी बंदिस्त कैद्यांच्या १६ वर्षांखालील मुला-मुलींना त्यांना थेट भेटू देण्याचा निर्णय घेतला.

गेटमध्ये भेटीची व्यवस्था
कारागृहात आत आणि बाहेर असे दोन गेट असतात. तेथे बंदिस्त कैदी आणि त्यांच्या मुलांच्या भेटीकरिता सोय करण्यात येणार आहे. चौथा शनिवार किंवा ज्या दिवशी कोर्ट नसेल त्या दिवशी ही मुलाखत करून देण्यात येणार आहे. या वेळी बाहेरून काही आतमध्ये येणार नाही याची मात्र पुरेपूर खबरदारी घेण्यात येईल. तळोजा कारागृहात सहकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून एक महिन्याच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी िदली.
बातम्या आणखी आहेत...