आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cid Inquary For The Nikalaje Dead Case Republican Leaders Demand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकाळजे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा - रिपब्लिकन नेत्यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील दलित कार्यकर्ते विलास अंबादास निकाळजे यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी केली. या प्रकरणी टोपे पिता-पुत्रांना सरकारने पाठीशी घातल्यास दलित जनतेचा उद्रेक होईल, असा इशाराही या नेत्यांनी दिला.

दै. ‘दिव्य मराठी’ने गुरुवारच्या अंकात विलास निकाळजे यांच्यावर विषप्रयोग झाल्याच्या आरोपाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यावरून रिपब्लिकन नेत्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात तरुण दलित दांपत्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर जालना येथे विलास निकाळजे प्रकरण घडणे आणि त्यामध्ये राष्‍ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश असणे दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

नि:पक्ष चौकशी करा - आनंदराज
राज्यातील गायरानच्या 90 टक्के जमिनी राजकारण्यांच्या कब्जात आहेत. या जमिनी दलितांच्या हक्काच्या असून त्यासाठी राज्यात हजारो दलित कार्यकर्ते धनदांडगे आणि प्रशासनाशी संघर्ष करत आहेत. विलास निकाळजे त्यापैकीच एक होता. निकाळजे प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवले असून, या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली.

प्रतिकार करण्याची वेळ : प्रा. कवाडे
खैरलांजी येथील 2006 मधील घटनेपासून राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दलितांवरील अत्याचारांची शासन, प्रशासन दखलच घेत नसेल तर दलितांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करण्याची वेळ आली असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. निकाळजे कुटुंबियांच्या पाठीशी आपला पक्ष न्याय मिळेपर्यंत खंबीरपणे उभा राहील, असेही कवाडे म्हणाले.

आरोप धादांत खोटे : टोपे
मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारीही आरोपांचा इन्कार करत हे राजकीय षड्यंत्र असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, मत्स्योदरी संस्थेला नियमानुसार मिळालेल्या जमिनीतून विलास निकाळजे व त्याचे सहकारी बुद्ध विहारासाठी जमीन मागत होते. त्या जमिनीवर अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही अशी हमी संस्थेने शासनाला दिली होेती, त्यामुळे त्यांची मागणी मान्य केली नाही. 9 जानेवारीस मी जालन्यात नव्हतो, मुंबईस मंत्रिमंडळ बैठकीसाठी गेलो होतो. त्यामुळे मी विलासला बंगल्यावर बोलावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांच्यासोबत तो बंगल्यावर आला असा आरोप आहे, ते समाधान शेजूळ व विलासचे चुलते जगन्नाथ निकाळजे यांंचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. त्यांनीही विलास बंगल्यावर त्यांच्यासोबत गेल्याचा इन्कार केला आहे. माझ्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले, त्यातही तसे काहीही दिसलेले नाही. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत.