आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदांसाठी रस्सीखेच : महामंडळेही आता काँग्रेसमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात सत्तेत येऊन २७ दिवस झालेल्या फडणवीस सरकारने आता विविध महामंडळांवरील काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील जनतेला स्मार्ट शहरांचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने या प्रक्रियेची सुरुवातही शहरे वसवणार्‍या सिडको या महामंडळापासून केली आहे. सिडकोच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव आणि सदस्यपदावरून काँग्रेस नेते नामदेव भगत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

जुळी शहरे वसवणारी जगात ख्यातनाम झालेल्या शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) संचालक मंडळ फडणवीस सरकारने बुधवारी बरखास्त केले असून नव्या संचालक मंडळात आपली वर्णी लागावी म्हणून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी होऊन आमदार झालेले मंदा म्हात्रे आणि प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अध्यक्ष पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

सिडकोमध्ये चार अशासकीय सदस्य असतात. त्यामध्ये एक अध्यक्ष व तीन संचालक असतात. काँग्रेस-राष्ट्रवादीने दोन दोन संचालक पदे वाटून घेतली होती. राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव यांच्याकडे अध्यक्षपद होते. हिंदूराव यांच्यापूर्वी नकुल पाटील राष्ट्रवादीचेच अध्यक्ष होते. मंदा म्हात्रे किंवा प्रशांत ठाकूर दोन्ही भाजप परंपरेतील नाहीत. इतके महत्त्वाचे पद नव्याने पक्षात आलेल्यांना कसे द्यायचे असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्षपदासाठी ऐनवेळी संघ-भाजप परिवारातील नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत स्वस्त घरांचे प्रकल्प, विमानतळ, सी लिंक, मेट्रो प्रकल्प, उड्डाण पूल अशा पायाभूत सुविधा िसडको उभारत आहे. या महामंडळातील उलाढाल मोठी आहे. त्यामुळे मंत्रिपदापेक्षा सिडकोवर वर्णी लागावी यासाठी ठाणे-रायगड जिंल्ह्यातील अनेकजण इच्छुक असतात.

नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे या वेळी नाईक यांचा पराभव करुन जायंट किलर ठरल्या आहेत. नाईक यांचा गड पूर्णांशाने उदध्वस्त करण्यासाठी आपल्याला अध्यक्ष करावे, असा आग्रह म्हात्रे यांनी धरला असल्याचे वृत्त आहे.

सोडती आधी सोडचिठ्ठी
सिडको राज्याच्या सर्व भागात जुळी शहरे वसवत आहे. मात्र, नवी मुंबई हा सिडकोचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यामुळे सिडकोच्या सर्व पदांवर रायगड-ठाणे जिल्ह्यातील नेत्यांचे आजपर्यंत वर्चस्व राहिलेले आहे. तो पायंडा या वेळी फडणवीस सरकार ठेवते की मोडते याचा उलगडा लवकरच होईल. २९ नोव्हेंबर रोजी सिडकोच्या खारघरमधील स्वप्नपूर्ती या मध्यमवर्गीयांसाठीच्या तीन हजार घरांच्या प्रकल्पांची सोडत आहे. या सोडतीपूर्वीच फडणवीस सरकारने जुन्या सदस्यांना सोडचिठ्ठी दिली.

प्रशांत ठाकूर यांना जातीचा आधार
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते पण आता भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले प्रशांत ठाकूरही सिडकोच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. ठाकूर पनवेलचे आहेत. तसेच त्यांचे वडील रामशेठ ठाकूर मोठे सरकारी कंत्राटदार आहेत. नवी मुंबईत आगरी समाज फार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे आपला विचार अध्यक्षपदासाठी करावा, असा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी फिल्डिंगही लावली आहे.