आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयासमोर स्वस्त घरांसाठी हजारोंच्या रांगा, गर्दी पांगवण्‍यासाठी आंदोलकांची उचलबांगडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे गगनाला भिडणार्‍या घरांच्या किमती आणि दुसरीकडे बिल्डरांना वाचवण्याचे सरकारी धोरण याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या गोरगरिबांची आणि सामान्यांची कशी ससेहोलपट होते याचे विदारक चित्र बुधवारी मंत्रालय परिसरात पाहायला मिळाले. अवघ्या 54 हजारांत पवईत घरे मिळणार म्हणून मंत्रालयासमोर तोबा गर्दी केली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची अक्षरश: उचलबांगडी केली. या मुद्दय़ावरून पत्रकारांनी धारेवर धरल्यानंतर पत्रकार परिषदच गुंडाळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी तेथून काढता पाय घेतला. तत्पूर्वी त्यांनी हा प्रकार अफवाच असल्याचे स्पष्टीकरण दिले.
54 हजारांत घरे मिळणार म्हणून मंत्रालयात शेकडोंच्या संख्येने पोहोचलेल्या गोरगरिबांना ही माहिती म्हणजे अफवा असल्याचे सांगून बोळवण करण्यात आली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र लोकशाहीवादी आघाडीने (एमडीएफ) याच मुद्दय़ावर आंदोलन करण्याचा निर्णय गेल्या महिन्यातच जाहीर केला होता. बुधवारी सकाळपासूनच मंत्रालयासमोर 54 हजारांत पवईत घर घेण्याच्या आशेने गरिबांच्या रांगा लागल्या. हिरानंदानी यांना पवई येथील भूखंड देण्यात आला तेव्हा गरिबांना घरे देण्याचे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले होते. मात्र, सरकारी नियमांचे उघड उल्लंघन करीत हिरानंदानी यांनी एकही घर गरिबाला दिले नाही. याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका न्यायालयात झाल्यावर न्यायालयाने त्यांना दोषी धरीत गरिबांसाठी 3 हजार घरे बांधण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वीच दिले. मात्र, सरकाने त्याकडे दुर्लक्ष केले.
कशी झाली सुरुवात ?
प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी पवई येथील हिरानंदानी संकुलात मोर्चा काढून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 54 हजार रुपयांत घरे द्यावीत, अशी मागणी केली. त्यांच्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावे फॉर्म तयार करून वाटण्यात आले. त्यामुळे ही गर्दी उसळली.