आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनदी अधिका-यांच्या बदल्या, मुख्यमंत्री कार्यालयाशी जवळीक असणा-यांना क्रीम खाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेले महिनाभर रखडलेल्यांपैकी आठ सनदी अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या झाल्या. त्यामध्ये पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंग यांच्या पत्नी वल्सा नायर सिंग यांना तब्बल पाच वर्षांनंतर पर्यायरण विभागातून हलवून एमएमआरडीएसारखे क्रीम पोस्टिंग देण्यात आले आहे. तीन वर्षांमध्ये सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्याचा नियम असतानाही वल्सा नायर यांना पर्यावरण विभागामध्ये पाच वर्षे ‘आश्रय’ मिळाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते.


ठाणे महापालिकेचे आयुक्त व आशिष सिंग यांचे मित्र आर. ए. राजीव यांना पर्यावरण खाते देण्यात आले आहे. त्यामुळे या बदल्यांवर मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिका-यांचाच प्रभाव प्रकर्षाने दिसून येत असल्याचे चर्चा ज्येष्ठ सनदी अधिका-यांमध्ये रंगली होती. वल्सा नायर यांचे पती आशिषकुमार सिंग यांचा दरारा सर्वच प्रशासनावर असल्याने पर्यावरण विभागानंतर त्यांना ‘क्रीम पोस्टिंग’ मिळणार हे गृहीतच होते.


मुख्यमंत्री कार्यालयाकडून बदलीपूर्वी विचारणा करण्यात आली होती तेव्हा त्यांनीच ‘एमएमआरडीए’ला पसंती दर्शवली होती, असे समजते. तसेच राजीव यांची वर्णीही पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या खात्यावर लागली असून ते आशिषकुमार सिंग यांचे जवळचे मित्र असल्याचा उल्लेख विधानसभेमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला होता. त्या वेळी विधानसभेच्या रेकॉर्डवरून राजीव यांचे नाव काढले जावे, यासाठीही मुख्यमंत्री कार्यालयातून प्रयत्न झाल्याचे समजते. राजीव यांना सिडको किंवा एमएमआरडीएमध्ये रस होता, असे समजते.


जीवन प्राधिकरणाची जबाबदारी संतोषकुमार यांच्याकडे
राधेश्याम मोपलवार ‘कोकणा’त
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सदस्य सचिव असलेल्या राधेश्याम मोपलवार यांना कोकणचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. मोपलवार हे बहुतांश वरिष्ठ मंत्र्यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या जवळचे होते, तर पूर्वी नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर काम करणा-या मोपलवार यांनी अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याशीही चांगले संबंध ठेवले होते. या वेळी राज्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी चांगले काम केले होते. आताच्या बदल्यांमध्ये त्यांची कोकण आयुक्तपदी नियुक्ती करण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न केल्याचे समजते.


अश्विनीकुमारसाठी बांठिया आग्रही
मोपलवार यांच्या जागी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर संतोषकुमार यांची बदली झाली आहे. ते मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काही काळ होते. राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी अश्विनीकुमार यांची वर्णी लागली. ही बदली धक्कादायक मानली जाते. त्यांची आतापर्यंत चांगल्या ठिकाणी वर्णी लागली नव्हती. मात्र मुख्य सचिव बांठिया यांच्या आग्रहामुळे त्यांना हे पद देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीकांत देशपांडे यांना कमी महत्त्वाचे पद हवे होते. त्यामुळे त्यांना सामान्य प्रशासन विभाग (चौकशी) देण्यात आला. मेरी नीलिमा केरकेट्टा यांना ‘महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास’ची जबाबदारी देण्यात आली असून ते फारसे महत्त्वाचे खाते नाही.


‘आयपीएस’ अधिका-यांच्या बदल्या अडकल्या कायद्याच्या वादात
आयपीएस अधिका-यांच्या बदल्या मात्र कायद्याच्या वादात अडकल्या असून नक्की कोणत्या कायद्यानुसार त्यांच्या बदल्या करायच्या यावर विचार सुरू असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. पोलिस कायदा सुधारणेबाबत प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च् न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार दोन वर्षांनी तर महाराष्ट्र पोलिस कायदा आणि बदल्यांचा कायदा यानुसार तीन वर्षांनी बदली केली जाते. गेल्या वर्षी काही अधिकारी मॅट आणि उच्च् न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला होता. त्यामुळे चार दिवसांपूर्वी आपली महाधिवक्त्यांशी चर्चा झाली. त्यांनीही प्रकाश सिंग प्रकरणातील सर्वोच्च् न्यायालयाचे निकालपत्र दाखवले. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवही उपस्थित होते. तीन वर्षांच्या नियमानुसार बदल्या करायच्या असतील तर आठ अधिकारी बदलीस पात्र होतात. त्यामुळे त्यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.