आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशानंतरही भाजप-सेनेत सामंजस्याचा अभाव! ठाकरेंची भाजपवर, दानवेंची शिवसेनेवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नगर परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेनेला यश मिळूनही या पक्षांत अद्यापही सामंजस्य आलेे नाही. ‘धाकटा भाऊ’ ५१ नगराध्यक्षपदे मिळवून पुढे गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. दुसरीकडे, या निवडणुकीत भाजप युतीच्याच बाजूने होता. मात्र, शिवसेनेकडून उशीर झाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. लवकर युती झाली असती तर चित्र चांगले दिसले असते, असे ते म्हणाले.
आम्ही फक्त भाजपशी युती केली : उद्धव ठाकरे
शिवसेनेने नगर परिषद निवडणुकांमध्ये सन २०११ पेक्षा चांगले यश मिळवत ५२९ जागा मिळवल्या खऱ्या; परंतु भाजप क्रमांक एकवर आल्याचे दुःख शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे पचवू शकलेले नाहीत. आम्ही फक्त भाजपशीच युती केली होती. मात्र, त्यांनी अनेकांशी युती केली, अशा शब्दांत टीका करत उद्धव यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘कोणी कोणी, कुठे कुठे युती केली होती हे सगळ्यांना ठाऊक आहे. शिवसेनेची युती फक्त भाजपशी झाली होती. अपवादात्मक स्थितीत ती स्थानिक आघाड्यांशी होती. भाजपशी युती केल्याने जसा आम्हाला फायदा झाला त्यापेक्षा जास्त फायदा भाजपला झाला.’ निवडणुकांदरम्यान मी एकही सभा घेतली नाही. आश्वासनांची खैरातही केली नाही. खोटी आश्वासनेही दिली नाहीत. सच्च्या शिवसैनिकाची ताकद काय असते हे मला दाखवून द्यायचे होते. शिवसैनिकांमुळेच आम्हाला चांगले य़श प्राप्त झाले. या विजयाचे संपूर्ण श्रेय शिवसैनिकांचेच आहे, असे उद्धव म्हणाले. महापालिकेत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव म्हणाले, ‘त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’
पुढील स्‍लाइडवर वाचा मी उद्धव यांच्याशी बोलतो, राऊतांशी नाही हे मुख्‍यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्‍य...
बातम्या आणखी आहेत...