आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cleanchit To Tatkare * Fouijya Khan? Homeministr Rr Patil Backs On Both

तटकरे-फौजिया खान निर्दोष : आधी पुरावे द्या, मगच बोला; आबांनी विरोधकांना सुनावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर झालेल्या जमीन भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी त्यांची पाठराखण करत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘पुरावे द्या आणि मगच बोला’, अशा शब्दांत शुक्रवारी विरोधकांना सुनावले. तसेच 26/11 हल्ल्यातील आरोपी अबू जुंदाल हा राज्यमंत्री फौजिया खान यांच्या आमदार निवासमधील खोलीमध्ये राहिल्याचे आरोपही गृहमंत्र्यांनी धुडकावून लावले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधी पक्षाने गुरुवारी विधानसभेत आणलेल्या प्रस्तावामध्ये खान आणि तटकरे यांना लक्ष्य केले होते. गृहमंत्र्यांनी शुक्रवारी त्याला उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले. तटकरे यांच्यावर आरोप करणार्‍या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचाही समाचार घेतला. सोमय्या यांच्या तक्रारींची संख्या पाहिली तर त्यांनी केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर अद्याप टीका केलेली नसल्याचे दिसून येते, असे खोचक वक्तव्य पाटील यांनी केले. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आरोप कोणीही करते, पण पुरावे द्या मग पाहू’, असे पाटील यांनी सांगितले. तसेच काही लोक उद्दिष्ट ठरवून नेहमीच तक्रार करतात, असा उलट आरोपही त्यांनी केला.
गुन्हे शाखेकडून शहानिशा- गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी याप्रकरणी तक्रार केली असेल तर चौकशी करणार का, असा सवाल केला. त्यावर पाटील म्हणाले की, सोमय्यांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे शाखेकडून शहानिशा होईल. त्यानंतर आवश्यक असेल ती चौकशी केली जाईल; पण त्यासाठी योग्य पुरावे द्यावे लागतील. तक्रार कोणाच्याही विरोधात केली जाऊ शकते; पण प्रत्येक तक्रार एफआयआर म्हणून नोंदली जात नाही. प्रत्येक जण कायद्यापुढे समान असले तरी पोलिसांकडूनच तपास होणे गरजेचे नसून इन्कम टॅक्ससारख्या इतर यंत्रणांच्या माध्यमातून तपास होऊ शकतो. नक्षलवादाच्या प्रश्नावर विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षांच्या गटनेत्यांनी एकत्र बैठक घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी उपाययोजना सुचवाव्यात, असेही पाटील यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना पाठिंबा देणार्‍या काही स्वयंसेवी संस्था असून मानवी हक्क आयोगासारख्या संस्थाही नक्षलवाद्यांच्या बाजूने काही वेळा उभ्या राहतात; पण शेकडोच्या संख्येने मरणार्‍या पोलिसांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिसांवर सतत टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची केले जात असल्याचे ते म्हणाले.
कैद्यांच्या कपड्यांसाठी अमेरिकेचे डिझाइन- गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा
राज्यातील गुन्ह्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणीवरून दिसून येते, असे सांगून पाटील यांनी आकडेवारीच वाचून दाखवली. आंध्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळपेक्षा कमी गुन्हे महाराष्ट्रात घडत आहेत. गुजरातच्या तुलनेत राज्यात कमी गुन्हे असून स्त्रिया, मुले, अनुसूचित जाती-जमातीचे लोक, अल्पसंख्याक अधिक सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला.
येरवडा तुरुंगामध्ये आरोपी सिद्दिकीची हत्या झाल्याप्रकरणी तातडीने तुरुंग अतिरिक्त पोलिस महासंचालकांना आपण निलंबित केल्याचे सांगून चुकांबद्दल पोलिसांना पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. सिद्दिकीची हत्या बर्म्युडाच्या नाडीने झाली. यापुढे एखाद्या कैद्याला जखमी करू शकतील किंवा आत्महत्या करता येतील, अशा पद्धतीचे कपडे द्यायचे नाही, असे ठरवले आहे. तसेच कैद्यांच्या कपड्यांची अमेरिकेतून खास डिझाइन्सही मागवली असल्याचे ते म्हणाले. याआधी एका कैद्याने जेवणाच्या चमच्याने दुसर्‍याला जखमी केले होते. त्यानंतर जेवणासाठी प्लॅस्टिकचे चमचे देण्यात येऊ लागल्याचे पाटील म्हणाले.
लोकप्रतिनिधींशी चर्चा करू- गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींनी दिलेल्या राजीनाम्याबाबतही गृहमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. तिथे 467 ग्रामपंचायती असून 3856 लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील 132 जणांनी व 29 पोलिस पाटलांनी राजीनामे दिले आहेत. त्यासाठी 22 कारणे दिली आहेत. त्यांच्याशी तिथे जाऊन चर्चा केली जाईल. स्थानिकांचे म्हणणे ऐकल्याशिवाय विकास केला जाणार नाही, असे पाटील यांनी नमूद केले.
पावसाळी अधिवेशन : विरोधकांकडून सुनील तटकरे आणि फौजिया खान टार्गेट
पवारांकडून ‘तट’राखण !, सुनील तटकरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले
सुनील तटकरेंच्या कंपन्यांत संचालकपदी उद्धव ठाकरेंचे कुटुंबीय
सुनील तटकरेंकडे कोट्यवधींची जमीन, बेकायदा व्यवहाराच्या चौकशीची मागणी