आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार आदिवासी गावांत क्लायमेट स्मार्ट व्हिलेज याेजना, 36 काेटींचा निधी मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आदिवासी गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना अार्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाने क्लायमॅट स्मार्ट व्हिलेज योजना तयार केली अाहे. केंद्र सरकारच्या मदतीने ती राज्यात राबवली जाणार असल्याची माहिती या खात्याचे उपसचिव प्रभाकर गावडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. केंद्र सरकारने या याेजनेसाठी राज्याला ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ३६ लाख रुपयांचा शेवटचा हप्ता लवकरच मिळेल. या योजनेसाठी गडचिराेली, पुणे व पालघर या जिल्ह्यातील निवड करण्यात अाली असून तेथील एक हजार आदिवासी गावांचा विकास केला जाईल.

हरियाणा आणि पंजाबमधील गावांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागातर्फे क्लायमॅट स्मार्ट व्हिलेजची योजना सन २००८ मध्ये आखण्यात अाली हाेती. बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया या संस्थेच्या मदतीने ही याेजना संबंधित राज्यात राबविण्यात अाली. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही ही योजना राबविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी पुढाकार घेतला आहे. गावडे यांनी सांगितले, ‘ही याेजना राबविण्याची सूचना केंद्रीय कृषी विभागानेे केली हाेती. त्यानुसार गेल्या वर्षीच प्रस्ताव पाठवण्यात आला. या याेजनेत राज्यातील हजार गावांची व त्यातील प्रत्येकी दहा शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार अाहे. गावे निवडण्यासाठी संबंधित संस्थेने सर्वेक्षण केले असून ते आता पूर्ण झाले आहे. लवकरच गावांची निवड करून ही योजना सुरु केली जाईल. तीन वर्षाच्या कालावधीचा हा उपक्रम असून पात्र शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर याचा लाभ मिळेल. ‘बोरलॉग’ तीन वर्षानंतर या योजनेचा संपूर्ण अहवाल सादर करील. जर शेतकऱ्यांना फायदा झाला नाही तर पुढील दोन वर्षे ही संस्था शेतकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे.
काय आहे योजना..
आदिवासी भागातील दहा शेतकऱ्यांची निवड करून त्यांना ऊर्जा, पाणी, जनावरे, खते यांच्यासह आधुनिक उपकरणांचा कसा वापर करावा हे शिकवले जाणार आहे. निवड केलेल्या गावातील मातीचे नमुने, सूर्यप्रकाश, वातावरणाचा अभ्यास करून कधी कोणते पीक कसे घ्यावे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. प्रत्येक गावातील दहा शेतकऱ्यांना प्रशिक्षित केल्यानंतर हे दहा शेतकरी अन्य शेतकऱ्यांना याची माहिती देऊन संपूर्ण गाव स्मार्ट करण्याचा प्रयत्न करतील.
बातम्या आणखी आहेत...