आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिनिकल असिस्टंट नेमणार;इंग्लंडमधील आरोग्य सेवा यंत्रणेद्वारे मिळेल प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डाॅक्टर अाराेग्य कर्मचारी नसल्याच्या अनेकदा तक्रारी येत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. तेथील परिचारिकांना उपचाराचे फारसे प्रशिक्षण नसल्याने त्या याेग्य त्या उपचार करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन आता डॉक्टर आणि परिचारिकांप्रमाणेच प्राथमिक अाराेग्य केंद्रात ‘क्लिनिकल असिस्टंट’ या पदाची निर्मिती करण्याचा विचार राज्य सरकार करत अाहे.

पुढील वर्षी सुरू केल्या जाणाऱ्या पॅरामेडिकल कोर्सेसबरोबरच या क्लिनिकल असिस्टंटना प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्तही ‘दिव्य मराठीने’च सर्वप्रथम दिले होते.आरोग्य मंत्र्यांनी सांगितले, ‘राज्यात एकूण १८२२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांवर आरोग्य विभाग सर्व सुविधा उपलब्ध करून देत असून डॉक्टरही उपलब्ध आहेत. परंतु कधी कधी डॉक्टर दौऱ्यावर वा खासगी कामासाठी रजेवर असल्यास रुग्णांवर उपचार करणे कठीण जाते. ही बाब लक्षात घेऊन क्लिनिकल असिस्टंट नेमण्याचा विचार सुरू आहे. यासाठी विज्ञान पदवीधरांची निवड केली जाणार आहे. डॉक्टर अाराेग्य केंद्रात नसताना हे क्लिनिकल असिस्टंट रुग्णांवर प्राथमिक उपचार करू शकतील. यासाठी त्यांना इंग्लंडमधील आरोग्य सेवा यंत्रणेकडून आपत्कालीन वैद्यकीय उपचाराचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल आणि याचा खर्चही आरोग्य विभाग करील. राज्यभरात एकूण दोन हजार क्लिनिकल असिस्टंट नेमले जातील. यामुळे डॉक्टर नसतानाही रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतील. जास्तीत जास्त डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून पॅरामेडिकल कोर्स आरोग्य विभाग पुढील वर्षीपासून सुरू करीत आहे. त्यासोबत क्लिनिकल असिस्टंटसाठी प्रशिक्षण सुरू केले जाईल.’

औषधी दुकानांमागे एक जेनरिक स्टोअर
‘राज्यातीलआरोग्य केंद्रांमध्ये जेनरिक औषधेच दिली जातात. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या जागेत नव्याने जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी प्रत्येक तीन औषधी दुकानांमागे एका जेनरिक औषधांच्या दुकानाला परवानगी द्यायला हवी,’ असे मत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.