आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिवासींच्या दिवाळीसाठी मुंबईच्या डबेवाल्यांची कपडा बँक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - असामान्य व्यवस्थापकीय कौशल्याचे धडे थेट गोऱ्या साहेबाला देणारे मुंबईचे डबेवाले आता आदिवासींच्या कपड्याचेही नियोजन करणार आहेत. मुंबईच्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील किंवा पंचतारांकित हॉटेल्समध्ये उरणारे अन्न गोळा करून ते भुकेल्यांच्या मुखापर्यंत पोहोचवणारी ‘रोटी बँक’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्यानंतर आता मुंबईचे डबेवाले आदिवासींना जुने का हाेईनात, पण अंगभर कपडे मिळवून देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. रोटी बँकच्या धर्तीवरच डबेवाल्यांची संघटना ‘कपडा बँक’ हा अनोखा उपक्रम साकारत आहे.
दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरी भागात जिथे कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरू असते तिथे मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात असंख्य आदिवासी लाेकांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. या भागातल्या आदिवासींसाठी तर यंदाची दिवाळी ही कुपोषणाच्या छायेत पार पडणार आहे. अशा वेळी या आदिवासींना डबेवाल्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो, या उद्देशाने डबेवाल्यांनी डिसेंबर २०१५ मध्ये रोटी बँक सुरू केली होती. आज या रोटी बँकेच्या माध्यमातून मुंबईतल्या जवळपास तीनशे ते चारशे गरीब- गरजूंना दोन वेळचे जेवण पुरवले जाते. गेल्या वर्षी या डबेवाल्यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पाचशे गरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ व महिलांना साडीचोळी दिली हाेती. ‘कपडा बँक’बाबत डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर म्हणाले की, ‘मुंबईत असा एक वर्ग अाहे जो फक्त कपड्यांची चमक जरी कमी झाली तरी ते कपडे फेकून देताे. वास्तविक हे कपडे चांगल्या दर्जाचे असतात, तरीही ते विनावापर पडून राहतात. ते कपडे आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांचा चांगला वापर होऊ शकेल, असे आम्हाला वाटले. त्यातून ही संकल्पना सुचली आणि लगेचच त्यावर अंमलबजावणी सुरू केली. दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत जमा हाेणारे हे कपडे आम्ही पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि तालासरी या विभागातील आदिवासी पाड्यांवर नेऊन स्वत: देणार असल्याचे तळेकर म्हणाले. ज्यांना धड अंगभर घालायला कपडे मिळत नाहीत त्यांना दिवाळी सणात नवीन कपडे नाही, तरी किमान जुने का होईना पण अंगभर कपडे मिळतील, ही भावना या मागे आहे, असेही ते म्हणाले.
मुंबईत कलेक्शन सेंटर्स
डबे वितरणासाठी आम्ही मुंबईत काही ठरावीक ठिकाणी जमत असतोच. त्या ठिकाणीच आम्ही कपड्यांची कलेक्शन सेंटर्स सुरू केली आहेत. याव्यतिरिक्त मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत डबेवाले उभे राहणार आहेत. त्यांच्याकडेही आपण जुने कपडे देऊ शकता. घरपोच कपडे गोळा करण्याची साेयही अाहे. डबेवाल्यांचे फोन नंबरही त्यासाठी जाहीर केलेत.
बातम्या आणखी आहेत...