मुंबई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या यंदाच्या आर्थिक वर्षात 4 हजार 240 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेलया बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईतील मेट्रो, मोनो, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठीची यात तरतूद आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो मार्गाच्या दुस-या टप्प्याला 500 कोटी रुपयांची तरतूद तर मुंबई मेट्रो रेल प्रकल्पासाठी एकून 634 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 2 साठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 134 वी बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असून नागरिकांना चांगल्या सुखसोयी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रगतीपथावरील व प्रस्तावित प्रकल्प प्राधिकरणाने नियोजित वेळेत पूर्ण करुन नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत उपलब्ध करुन द्याव्यात. नवीन कामे हाती घेताना त्यासाठी लागणारे जमीन संपादन वेळेत पुर्ण करावे. तसेच यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतुद प्रकल्पाच्या किंमतीमध्ये समाविष्ट करावी. नवीन कामे हाती घेताना त्याचा मास्टर प्लॅन तयार करावा. विकास कामे करताना त्याचा सामुहिक विकास होईल, या दृष्टीने नियोजन करावे. मेट्रो, मोनोरेल,सांताक्रूझ –चेंबूर जोड रस्ता, अमर महल जंक्शन येथील उड्डाणपूल, पूर्व मूक्त मार्ग, मिलन रेल्वे ओलांडणी पूल, खेरवाडी उड्डाण पूल आणि सहार उन्नत मार्ग असे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे मुंबई शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबई शहर जागतिक दर्जाचे होण्यास मदत होत आहे. यापुढील प्रस्तावित प्रकल्पही प्राधिकरणाने नियोजित वेळेत पुर्ण करुन नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मंजूर केलेल्या 2014-15 च्या अर्थसंकल्पात 3,628 कोटीच्या विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाला प्राधिकरणाने मंजूरी दिली. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये महत्वाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. यामध्ये चार उड्डाणपूल, रेवस पासून कारंजापर्यंत जाणारा रेवस खाडी पूल आणि माणकोली- मोटेगाव आणि उल्हास खाडीजवळील कल्याण- भिंवडी रस्ता येथील दोन पुलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग-4 वरील टक्का कॉलनी ते पळस्पे फाटा, खोपोली शहर वळण रस्ता, भिंवडी वळण रस्ता, कल्याण वळण रस्ता आणि शिरगाव फाटा आणि बदलापूरला जोडणाऱ्या जोडरस्त्याचाही यात समावेश आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई शहरामध्ये उड्डाणपूल आणि रस्ते विकासासाठी 215 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई रेल विकास महामंडळातर्फे नवीन रेल्वे गाड्या खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
(छायाचित्र- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थसंकल्पीय बैठक घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे 4240 रूपये कोटींच्या कामांना परवानगी दिली.)