आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Chavan & Dy.cm Pawar Condolence To Smita Talwalkar

मराठी सिनेसृष्टीतील ‘स्मितहास्य’ लोपले- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तळवलकरांना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या सकस आणि दमदार अभिनयाने मराठी चित्रसृष्टीला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील स्मितहास्य लोपले आहे. नव्या पिढीतील कलावंतांना विविध व्यासपीठांवर संधी देणारे व्यक्तीमत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. मराठी रसिक प्रेक्षकांना नेहमीच आनंद देणाऱ्या स्मिता तळवलकर यांचे निधन ही फारच दुःखद घटना आहे, अशी शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, स्मिता तळवलकर यांनी चित्रपट अभिनयाबरोबरच नाट्य, दिग्दर्शन, वृत्तनिवेदन, चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी आदी विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. चित्रपटापासून कारकिर्द सुरू केल्यानंतर यशाची अनेक शिखरे गाठताना आपल्यातील संवेदनशील आणि प्रयोगशील कलाकाराला धक्का लागू दिला नाही. लहान पडद्याच्या माध्यमातून मराठी नाटक आणि चित्रपटांनी देशाची सीमा ओलांडावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. निर्माती म्हणून सरस कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या. अनेक पुरस्कार मिळवित असताना कर्तव्यभावनेने मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीला अधिक यश मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गेली चार वर्षे असाध्य रोगाशी लढा देतानाही चित्रपटसृष्टीप्रती असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. स्मिता तळवलकर यांच्यामुळे अनेक नव्या कलाकारांना त्यामुळे चित्रपट आणि नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनामुळे नव्या कलावंतांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीची झालेली हानी न भरून निघणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, 'तू तिथे मी', 'चौकट राजा', 'कळत नकळत', 'सातच्या आत घरात' अशा अनेक दर्जेदार चित्रपटांची आणि पेशवाई, अवंतिका, उंच माझा झोका यासारख्या मालिकांची निर्मिती करून रसिक प्रेक्षकांना नेहमीच आनंद देणाऱ्या स्मिता तळवलकर यांचे निधन ही फारच दुःखद घटना आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांच्या क्षेत्रात त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाचा अमीट ठसा उमटवला. 'अस्मिता चित्र अकादमी' स्थापन करून त्यांनी नवोदितांना व्यासपीठ मिळवून दिले. राष्ट्रीय पुरस्कारांसह अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. चित्रपट आणि नाट्यसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या या बहुआयामी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत आपल्या भावना पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.