आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री चव्हाण उतरणार निवडणुकीच्या रणांगणात! दक्षिण कराड मतदारसंघाची बांधणी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आधी जनतेतून निवडून येऊन दाखवा,’ हे शरद पवार यांचे आव्हान स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दक्षिण कराड मतदारसंघाची निवड करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत नजीकच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी आजवर मुख्यमंत्र्यांवर ‘लादलेले नेतृत्व’ अशी अनेकदा टीका केली. ‘आधी जनतेतून निवडून येऊन दाखवा, मग लोकांच्या प्रश्नाबाबत बोला,’ असे टोलेही लगावण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची धूळधाण उडून फक्त दोनच खासदार निवडून आले, तेही स्वत:च्याच प्रभावावर. त्यांच्या विजयात पक्षाचा फारसा वाटा नसल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलावा यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हायकमांडकडे युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी याही परिस्थितीत चव्हाणांवर विश्वास टाकला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वीच मतदारसंघ बांधणीस सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी खाशाबा जाधव यांच्या नावाने असलेल्या कराडमधील व्यायामशाळेला सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला, जो अनेक वर्षे मंत्रालयाच्या लाल फितीत अडकून होता. तसेच आपले खास समर्थक व कॉँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांना नुकतेच विधान परिषदेवरही पाठवले. आनंदराव पाटील यांनीही आपली आमदारकी पृथ्वीराज यांचे आई-वडील आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाकाकी यांना अर्पण करीत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या माध्यमातूनही चव्हाण विजयाचे गणित मांडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उंडाळकरांचा पत्ता कापणार
दक्षिण कराडचे विद्यमान कॉँग्रेस आमदार विलास पाटील उंडाळकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र, चव्हाण व त्यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. गेल्या वर्षी उंडाळकरांचा मुलगा उदयसिंह पाटील याला महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. निवडणुकीत विरोधी पक्ष याचे भांडवल करू शकतो आणि त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळेच उंडाळकरांचे तिकीट कापून चव्हाण स्वत:च रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

निर्णय कशासाठी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांनी कराडमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: निवडणुकीला उभे राहिले तरच अन्य उमेदवारांवर त्याचा चांगला परिणाम होईल आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा जास्तीत जास्त फायदा काँग्रेसला मिळेल असे हायकमांडला वाटत आहे. मुख्यमंत्री लवकरच आपल्या उमेदवारीबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.