आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जघोळ: 10 हजारांच्या तातडीच्या कर्जासाठीही शेतकर्‍यांना निकष व अटी; शपथपत्राची सक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - थकबाकीदार शेतकऱ्यांना बी- बियाणे खरेदीसाठी १० हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याबाबतचा शासनादेश बुधवारी रात्री काढण्यात आला. यात कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शपथपत्र देणे सक्तीचे केले आहे. मात्र शेतकऱ्यांनी असे शपथपत्र देण्याची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात सांगितले. बी-बियाणे खरेदीसाठी तातडीचे १० हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता.

बुधवारी रात्री सरकारने शासनादेश काढल्यामुळे हे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या शासनादेशात काही अटी घातल्या आहेत. शपथपत्र देणे ही त्यातीलच एक अट आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी शपथपत्राची सक्ती नसल्याचे तोंडी सांगितले. मात्र शासनादेशात दुरुस्ती केल्याशिवाय व बँका शेतकऱ्यांना शपथपत्र घेतल्याशिवाय कर्ज देतील का, असा प्रश्न आहे.

कागदपत्रे छाननीसाठी वेळ नसल्याने शपथपत्र हवेच : सहकारमंत्री
खरीप हंगामाच्या खर्चापोटी शेतकऱ्यांना १० हजारांची रक्कम आपण तत्काळ देत आहोत. त्यामुळे कागदपत्रे छाननीस वेळ नाही. म्हणून आपण शपथपत्र भरून घेत आहोत. सध्या जे १० हजार आपण देत आहोत, ते अनुदान नाही तर कर्ज असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. धुळे-नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर आणि वर्धा या १४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अडचणीत आहेत. या जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्ज देण्यात येईल, असे सहकारमंत्री देशमुख म्हणाले.

४० लाख शेतकऱ्यांनाच मिळणार तातडीचे कर्ज
राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यातील ८० लाख पीक कर्ज घेतात. पेरणी, बियाण्यासाठी जे १० हजार कर्ज दिले जात आहे त्याला अनेक निकष आहेत. त्यामुळे ४० लाख सधन शेतकरी अपात्र ठरतील व सुमारे ४० लाख शेतकरी १० हजार कर्ज मिळण्यास पात्र ठरतील.

कर्जाबाबत शंकानिरसन, शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन
राज्य सरकारच्या हमीवर आधारित  कर्जासाठी अपात्रतेचे काही निकष आहेत. हे निकष केवळ या दहा हजारांच्या कर्जासाठीच आहेत. या कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या शंकानिरसनासाठी १८००२३३०२४४ या दूरध्वनी क्रमांकाची विशेष हेल्पलाइन देण्यात आली आहे.

प्रत्येक गरजू शेतकऱ्याला कर्जमाफी, अटींबाबत अाग्रही नाही : मुख्यमंत्री
आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला होता. मात्र या सरकारच्या काळातील कर्जमाफीचा निर्णय पूर्णतः वेगळा असेल. धनाढ्य लोकांना या कर्जमाफीतून वगळले जाईल. एकही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तातडीच्या कर्जासाठी काही अटी असल्या तरी सरकार फार आग्रही नाही, असे ते म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...