आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलातील वस्तूंवर आधारीत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील- फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली- जगाच्या पर्यावरण संतुलनात वनांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. जिल्हयातील वनावरील इंधनाचा भार कमी करुन जिल्ह्यात वनांवर आधारीत जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज कुरखेडा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील परिसरात गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी रणजितकुमार, आ. कृष्णा गजबे, गडचिरोली वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी, वडसा उपवनसंरक्षक एम.ए. रेड्डी यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अगरबत्ती काडयाची जास्तीत जास्त निर्मिती जिल्ह्यातच झाली पाहिजे यासाठी येथेच युनिट उभारण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. वन संतुलन राखणाऱ्या जिल्हयांना निश्चितच मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी केली. मागील दोन वर्षापासुन याप्रकल्पात काम करणाऱ्या गोठणगांव येथील संदीप कमरु याची आस्थेवाईकपणे विचारपुस केली. यावेळी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
मोहफुलापासुन तयार करण्यात आलेल्या शरबत, जाम तसेच लाख निर्मितीसाठी कुसूम, करंजची माहिती त्यांनी जाणुन घेतली. मोहफुलापासुन काढण्यात आलेले तेल, राखेपासुन तयार करण्यात आलेल्या विटा, पळसाच्या पानापासुन तयार करण्यात आलेल्या पत्रावळींची, बांबुपासून बनविण्यात आलेल्या विविध वस्तुंची पाहणी मुख्यमंत्र्यानी केली. संयुक्त वनव्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोंढाळा येथील नितीन राऊत, टेंभणीचे प्रमोद सहारे आणि उसेगांव येथील राजहंस बोदेले यांनी वनव्यवस्थापनात व रोजगार निर्मितीतील गावाने केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या कामाचे कौतुक केले.