आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह महाराष्ट्रातील गुंतवणूक अधिक फायद्याची- मुख्यमंत्री फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम- देशात विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले असून त्यात महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आम्हाला केवळ गुंतवणूक हवी आहे, म्हणून उद्योगांनी भारतात व महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असे आम्ही म्हणणार नाहीत. पण, ही एक संधी असून ती साधणारे भविष्यात खऱ्या अर्थाने फायद्यात राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे दिली.
स्वीडीश-भारतीय गुंतवणूकदारांच्या मंचाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री स्वीडनमधील आघाडीच्या उद्योगांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
देशात विशेषत: राज्यात अनेक स्वीडीश कंपन्या चांगल्या पद्धतीने कार्यरत असल्याचा दाखला देऊन मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 15 टक्के आहे. देशात एकूण येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीपैकी 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते. भारताच्या एकूण निर्यातीत 30 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा असून राज्याची हीच खरी ताकद आहे. ‘इज इन डुईंग बिझनेस’च्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी विविध जाचक अटी,
नियमन दूर करुन अधिक सुलभ व गतिमान प्रक्रिया अमलात आणली. उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांची संख्या 75 वरुन 25 वर आणल्या. आता आम्ही या सर्व प्रक्रिया एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणत आहोत. खऱ्या अर्थाने ती सिंगल विंडो प्रणाली असेल. महाराष्ट्रात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांसाठी आमच्याकडे विशेष योजना आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून मार्गदर्शन, जागा, पाणी, वीज आदींची उपलब्धताही केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राची 53 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील असून तरुणांचा हा वर्ग तंत्रकुशल असल्याचे सांगून ते म्हणाले, संपूर्ण जगातील औद्योगिक क्षेत्राची मनुष्यबळाची गरज भागविण्याची ताकद भारतासह महाराष्ट्राकडे आहे. जागतिक उद्योजकांनी आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. कारण त्यांना आवश्यक असणाऱ्या साऱ्या गरजांची पूर्तता महाराष्ट्र करु शकतो. तसेच उद्योगांसाठी राज्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. जगात आर्थिक क्षेत्रात कितीही चढ-उतार होत असले तरी भारताच्या विकासाच्या वाटचालीस आता खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. भारताची अर्थव्यवस्था यापुढे आणखी वेगाने विकसित होणार आहे. त्याचा उद्योगांनी फायदा करुन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तत्पूर्वी ‘एसएएबी’चे अध्यक्ष मॅर्क्युस वॉलेनबर्ग यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली आणि विमानतळ सुरक्षा या क्षेत्रात गुंतवणूक संधींवर यावेळी त्यांच्यात चर्चा झाली.