आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadanvis Live Communicate With Student

मुख्यमंत्र्यांच्या प्रथमच विद्यार्थ्यांशी ‘लाइव्ह गप्पा’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मैदाने आणि बगिचे असतील का, प्रदूषणाचा प्रश्न सुटून सुखकर वाहतूक सुविधा मिळणार का, असे एक ना अनेक आपल्या स्वप्नातल्या स्मार्ट सिटीसंदर्भात पडलेले प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी खचाखच भरलेल्या सभागृहातील प्रत्येक विद्यार्थी आसुसलेला होता. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांचा तास सुरू झाला आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
निमित्त होते.. "माझ्या मनातील स्मार्ट सिटी' निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाइव्ह चर्चासत्रात सहभाग घेतला.
सोळा शाळांमधील पाचवी ते दहावी इयत्तांचे एक हजार विद्यार्थी डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयातल्या आगरी समाज सभागृहात जमले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्रीही अापल्याशी नेमके कसे बोलतील, असा प्रश्न प्रत्येकाला होता. मंचावर उभारलेल्या भव्य डिजिटल पडद्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. पडद्यावर हात उंचावून विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच विद्यार्थ्यांनीही हात उंचावून त्यांना दाद दिली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी प्रश्न लिहून आणले होते. शिक्षिका एकेका विद्यार्थ्याचे नाव पुकारत होत्या. तसे विद्यार्थी-विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत होते. कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीबरोबरच उद्यान, खेळासाठी पुरेशी जागा असणे, प्रदूषणाची समस्या, सौरऊर्जेचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, वाहतूक असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना समजतील अशी उत्तरे दिली. एक तासानंतर फडणवीस सरांचा तास संपत आला तसे बरेच विद्यार्थी रंगमंचाजवळ येऊन ‘एकच प्रश्न, एकच प्रश्न’ विचारू द्या, असे आयोजकांना सांगत होते.
मुख्यमंत्रीही खुश
मुख्यमंत्रीदेखील मुलांनी विचारलेल्या प्रश्नांवर खुश होते. त्यामुळे त्यांना नाराज न करता मुख्यमंत्री म्हणाले की, मुलांनो, तुमचे उरलेले प्रश्न लेखी स्वरूपात माझ्याकडे पाठवा. मी ते वाचेन आणि सगळ्यात चांगले दहा प्रश्न निवडून त्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांना मी चर्चेसाठी आमंत्रित करीन, असे सांगितल्यावर मुलांचे समाधान झाले. स्मार्ट सिटीबद्दलच्या मुलांच्या संकल्पना खूप चांगल्या असून तुम्हीच खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीचे दूत म्हणून काम कराल, अशी शाबासकीची थापच मुख्यमंत्र्यांकडून मिळाली आणि त्या आनंदातच विद्यार्थी वर्गातून बाहेर पडले.