आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सत्ता सोडली : सूत्र शिवसेनेचे, डाव भाजपचा; कारभारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेने मुंबई महापौरपदासाठी शनिवारी सकाळी विश्वनाथ महाडेश्वर व उपमहापाैरपदासाठी हेमांगी वरळीकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजप महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार नसल्याची चकित करणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. 
 
भाजप पारदर्शक कारभारावर ठाम असून मुंबईसाठी विशेष उपलोकायुक्त नियुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीत पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या दीड तासाच्या चर्चेतच हे सर्व डावपेच ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
 
मुख्यमंत्री  म्हणाले, महापौर, उपमहापौर पदाची भाजप निवडणूक लढवणार नाही, एकाही समितीचे अध्यक्षपद भाजप स्वीकारणार नाही. प्रभाग समित्यांच्या निवडणुकाही आम्ही लढवणार नाही. मात्र याचा अर्थ भाजप विरोधी पक्षाचे काम करेल, असे नाही.मुंबईच्या विकासासाठी आवश्यक तेथे सत्तारूढ पक्षाला भाजप मतदान करेल. महापालिकेच्या कारभारात अधिक पारदर्शकता यावी, म्हणून राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. ही समिती महापालिकांचे सध्याचे कायदे, नियमांचा अभ्यास करून अधिकच्या शिफारशी करणार आहे.

दिल्लीत ठरली रणनीती, मुंबईत घोषणा
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीची सर्व रणनीती दिल्लीत ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दीड तासाच्या चर्चेत हे सर्व डावपेच ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

२८ फेब्रुवारी २०१७, नवी दिल्ली
मुंबईत महापौरपदाचा पेच व पुढील रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दीड तास चर्चा.

मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितले : भाजप दुसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर तडजोड करून भाजपचा महापौर बनवावा असे काही नेत्यांचे म्हणणे होते. मात्र अस्थिर सत्ता राबवण्यापेक्षा सेनेप्रमाणे सत्तेत सहभागी होऊन सत्तेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री व अन्य नेत्यांना वाटत होते. ही कल्पना मोदींना ऐकवली. 

असे ठरले गणित : दिल्ली येथे पंतप्रधानांसोबत झालेल्या दीड तासाच्या बैठकीत सत्तेबाबतच्या सर्व गणितांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही कल्पना आवडली. 
गो अहेडचा सिग्नल : पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस यांच्या कल्पनेला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर गो अहेड असे सांगितले.

३ मार्च २०१७, मुंबई 
शुक्रवारी रात्री कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोदींशी झालेल्या चर्चेची कल्पना सर्वांना दिली. नंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. माध्यमांना एवढ्यातच ही माहिती कोणीही देऊ नये असे नेत्यांना सांगण्यात आले.

४ मार्च २०१७, मुंबई, पत्रकार परिषद 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची रणनीती जाहीर केली. मुंबईत महापौरपदाचा उमेदवार न देण्याचा निर्णय घोषित केला.

सूत्र सेनेचे, आता डाव भाजपचा 
शिवसेनेला सत्ता राबवताना पदोपदी आता भाजपच्या विरोधाचा सामना करावा लागणार असून पारदर्शी कारभार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मोदी भेटीत ही रणनीती ठरली.

मुंबईतील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र उपलोकायुक्त
मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमण्यात येईल. यामुळे मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभारावर चाप बसण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकप्रतिनिधींनी गैरव्यवहार केल्यास त्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार जनतेला आहे, त्यासाठी नागरिक आपली तक्रार उप-लोकायुक्तांकडे दाखल करू शकतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...विश्वनाथ महाडेश्वर होणार मुंबईचे महापौर, पहिल्यांदाच उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...