नागपूर- महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रक्रीया आणि ‘उद्योगस्नेही वातावरणा’ची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
अमेरिकेचे महावाणिज्यदूत थॉमस वाडा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील 22 प्रमुख उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींनी आज फडणवीस यांची ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्व सुविधायुक्त ‘मिहान’मध्ये आणि महाराष्ट्रात कोठेही उद्योग उभारण्याचे आवाहन त्यांना केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चेला या विभागाचेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे अमेरिकेबरोबरच सर्व जगातील गुंतवणुकदारांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. रस्ते, रेल्वे, हवाई, बंदरे अशा सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा महाराष्ट्रात आहेत. मात्र उद्योग सुरु करताना ज्या विविध विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात, त्यांची संख्या आणि त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्र्यांचा समावेश असलेली एक आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दुसरी अशी दोन उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या व असलेल्या उद्योगांचा विस्तार करणाऱ्या सर्व उद्योगांचे आम्ही मनापासुन स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘मेक इन महाराष्ट्र’मुळे उद्योजक प्रभावित- यावेळी उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा
आपला अनुभव अतिशय समाधानकारक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच ‘मेक इन महाराष्ट्र’ संदर्भात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याबाबत जे निर्णय घेतले, त्याबद्दल समाधान व्यक्त करुन आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यात आता अधिक स्वारस्य निर्माण झाल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले.
पुढे वाचा, कोणत्या कंपन्यांचे प्रतिनिधींनी फडणवीसांची घेतली भेट...