आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Meeting With Commissinor About Dengue Diseases

राज्यात डेंग्यूचा कहर; जनजागृतीसाठी सोशल मिडिया वापराचे फडणवीसांचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यभर डेंग्यूच्या आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून, या आजारात राज्यात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. डेंग्यूबाबत इतर उपायांबरोबरच सोशल मिडियाचाही जनजागृतीसाठी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
डेंग्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी डेंग्यूबाबतची खबरदारी व मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या उपायांबद्दल सादरीकरण केले.
डेंग्यूबाबत रेडिओ जिंगल्स, रिक्षा-टॅक्सी, प्रसार फेरी याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईत 227 फवारणी यंत्रांद्वारे डास प्रतिबंधक धूर फवारणी केली जात आहे. एखाद्या घरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील 500 घरांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच 900 वर्कर्स डेंग्यूच्या अळया शोधण्यासाठी घरोघरी भेट देऊन तपासणीचे काम करीत आहेत. त्यांच्याद्वारे दररोज 50 ते 60 घरे या प्रमाणात साडेदहा लाख घरे तपासली जाणार आहेत. अशी माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी हे लोकांना समजावून त्याविषयी जनजागृती होणे महत्वाचे आहे. या जनजागृतीच्या कामामध्ये राज्यातील काही महत्वाच्या सिलेब्रिटीजना सहभागी करुन घेण्यात यावे. सिलेब्रिटीजद्वारे टिवटरवरुन डेंग्यू विषयक आजाराची जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविता येईल. तसेच येत्या 14 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये डेंग्यूबाबत घ्यावयाची काळजी व स्वच्छता या
अभियानाचाही समावेश करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.