आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Meeting With Senior Cops Regarding Cctv Camera's In Metro City

राज्यातील प्रमुख शहरांत CCTV कॅमेरे लवकरात लवकर बसवा- फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी प्रमुख शहरात सीसी टीव्ही सारखी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील प्रमुख शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसी टिव्ही यंत्रणेच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल, गृह (विशेष) विभागाचे सचिव विनित अग्रवाल, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारिया, पोलीस संचालक (गृहबांधणी) जावेद अहमद, अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) श्री. वेंकटेश्वरन, आयुक्त गुप्तवार्ता श्रीमती रश्मी शुक्ला आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी तेथील सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक असून सध्या तेथे भाड्याने सीसी टीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे त्याच्या खर्चाचा आढावा घेऊन तेथे कायमस्वरुपी यंत्रणा बसविण्याचा विचार करावा, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पोलीस विभागाला पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, पोलीस विभागाचे आधुनिकीकरण, रिक्त पदे, पोलीसांसाठी असलेली 12 वी (2012-2017) पंचवार्षिक योजना, नक्षलग्रस्त भागासाठी पोलीस ठाणे सशक्त-दूरकेंद्र इमारतीचे बांधकाम, नक्षलभागात प्रभावी दळणवळण यंत्रणा, अर्थसंकल्पिय तरतूद आणि खर्च, पोलीस निवासस्थाने, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ह्या उत्तम तंत्रज्ञान आणि आधुनिक साधन-सामुग्रीने सुसज्ज असणे आवश्यक असून यासाठी सध्याच्या प्रयोगशाळा अद्ययावत कराव्यात, त्यामुळे तपासकार्य लवकर होण्यास मदत होऊन जनतेला वेळेत न्याय मिळू शकेल, पोलीसांना येणाऱ्या समस्यांबाबत लक्ष घालून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.