मुंबई- युती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना फडणवीस सरकारच्या जमेच्या बाजूपेक्षा उणिवा प्रकर्षाने जनतेसमोर येऊ लागल्या आहेत. प्रसार माध्यमांकडूनही सरकारची कार्यपद्धती, कार्यक्रम, यंत्रणा तसेच प्रशासकीय कारभारावर जोरदार टीका होत आहे. परिणामी जनसामान्यांमध्ये सरकारविरोधी वातावरण निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क झाले आहेत.
‘सरकारवर झालेल्या टीकेचा त्याच दिवशी लगेच खुलासा करावा’, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काढले आहेत. याविषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी माहिती व जनसंपर्क विभागाला दिले आहे.
वेगवेगळ्या कारणाने सरकारवर टीका होत असते. यातील काही आरोपांमध्ये तथ्य असते तर काही आरोप केवळ प्रसिद्धीसाठी केले जातात. मात्र याविषयी संबंधित यंत्रणेकडून तत्काळ खुलासा होत नसल्याने नागरिकांमध्ये सरकारविरोधी गैरसमज वाढत आहेत. याच कारणामुळे मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. यापुढे अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमांद्वारे प्रकाशित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्याचा खुलासा संबंधित प्रसारमाध्यम संस्थेकडे पाठवण्यात यावा. बातमी प्रसारित झाल्याच्या दिवशीच दुपारपर्यंत खुलासा करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.
जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या विभागासाठी नियुक्त केलेल्या विभागीय जनसंपर्क अधिकाऱ्यांची खुलासा करण्यासाठी मदत घ्यावी तसेच त्या खुलाशाची एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कक्षाकडे दुपारी ३ वाजेपर्यंत न चुकता पाठवावी. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व त्यांच्या विभागाशी संबंधित वृत्त असल्यास खुलाशासाठीचा मजकूर मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कक्षाकडे तत्काळ देण्यात यावा, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत. ज्या विभाग प्रमुखांकडून वेळेत खुलासा केला जाणार नाही, अशा विभागप्रमुखांबाबतचा अहवाल दर आठवड्याला माहिती महासंचालनालयाने तयार करावा आणि तो मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडे पाठवावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
फडणवीस टीकेचे धनी
सनदी अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्या होत असल्याने मुख्यमंत्र्यांवर टीका झाली आहे. बदल्या झाल्यानंतर फडणवीस हे परदेश दौऱ्यावर निघून गेल्याचेही बऱ्याचदा दिसून आले होते. महेश झगडे, संजय पांडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली केल्यानंतर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी ही टीका मनावर घेऊन तत्काळ खुलासा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.