आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इस्रायलने पुढे यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इस्रायलने ‘सेंटर फॉर पीस’ फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीसह महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे अावाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेज यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान केले. विशेषत: यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत अशा मदतीची अधिक गरज असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

इस्रायल दाैऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पेरेज यांच्याशी चर्चा करून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले. इस्रायलमधील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून अाेळख असलेले पेरेज हे २००७ ते २०१४ या काळात इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष होते. तसेच सलग दोनवेळा इस्रायलचे पंतप्रधान हाेण्याचा मानही त्यांना मिळाला अाहे. त्यांच्या संकल्पनेतून सेंटर फॉर पीस ही संघटना साकारली आहे. महाराष्ट्रात एकत्रितपणे काम करता येऊ शकणाऱ्या क्षेत्राबाबत यावेळी फडणवीस व पेरेज यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे शंभर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कृषीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जेथ्रो तसेच डीमीटर या दोन्ही संघटनांशी महाराष्ट्रातील प्रमुख अधिकाऱ्यांनी या दाैऱ्यात चर्चा केली. या दोन्ही संघटनांनी यवतमाळ आणि उस्मानाबाद येथे पथक पाठविण्याचे मान्य केले आहे.

जेथ्रो हा निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समूह असून, इस्रायलमधील मोशाव (कृषीगाव) या संकल्पनेवर काम करणारा तो मोठा गट आहे. डीमीटर हाही तज्ज्ञांचा समूह असून तो कृषी, पाणी आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये काम करतो. अशा प्रकल्पांच्या नियोजनासह संशोधन, तंत्रज्ञान यासाठी हा समूह मदत करतो. या दोन्ही समूहांच्या पथकांनी महाराष्ट्रात येण्याचे मान्य केले अाहे. तसेच कृषी क्षेत्राला मूल्याधिष्ठित करून उत्पादन, जैविक खते याबाबत तांत्रिक मदत करण्याचे आश्वासन दिले.
अाधुनिकेचा स्वीकार शेतकऱ्यांनी करावा
‘इस्रायलमधील शेतकरी हा मूलत: संशोधक वृत्तीचा आहे. जुन्या विचारांना तो चिकटून बसत नाही. नवीन ते स्वीकारण्याकडे त्याचा कल असतो. महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा समृद्ध होऊ शकतो. मात्र, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. इस्रायलकडे तेल नाही, पण तेलनिर्मिती करणाऱ्या इराणपेक्षाही त्याचे सकल घरेलू उत्पन्न (जीडीपी) अधिक आहे. आर्थिक प्रगतीसाठी कृषी आणि तत्सम क्षेत्रात संशोधन आणि विकासावर भर देण्यामुळेच हे शक्य झाले.
शिमॉन पेरेज, माजी राष्ट्राध्यक्ष, इस्रायल
बातम्या आणखी आहेत...