आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Today Midnight Towords To China Tour With Pm

‘मेक इन महाराष्ट्र’ला चालना देण्यासाठी चीन दौ-याचा फायदा होईल- फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांचा चीन देशाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री गुरुवारी (दि. 14) पहाटे दीड वाजता रवाना होणार आहेत. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस हे अन्य दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत सहभागी होत आहेत. ‘मेक इन महाराष्ट्र’ला चालना देण्यासाठी चीन दौ-याचा मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौ-याच्या पूर्वसंध्येला बोलताना सांगितले.
बीजिंग येथे शुक्रवारी (दि. 15) ते मोदी यांच्यासमवेत ‘स्टेट/प्रोव्हिन्शीयल लिडर्स फोरम’मध्ये सहभागी होतील. याच फोरममध्ये होणाऱ्या ‘भारत-चीन विकासविषयक भागीदारी संबंध दृढ करण्याविषयी राज्यांची भूमिका’ आणि ‘सस्टनेबल अर्बनायझेशन : स्मार्ट सिटी, स्मार्ट लिव्हिंग’ या चर्चासत्रांमध्येही मुख्यमंत्री सहभागी होतील. या दरम्यान महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्याचा सोहळाही यावेळी पार पडणार आहे.
शनिवारी मुख्यमंत्री याप, तैयुआन हेवी इंडस्ट्री, सीजीजीसी, ग्रेट वॉल मोटार्स, सॅनी या उद्योगसमुहांसोबत बैठका घेतील. याच दिवशी डुंगहाँग येथे औरंगाबाद आणि डुंगहाँग (गानसू) या शहरांमध्ये सिस्टर सिटी करार होणार असून त्यासाठी परस्पर सहकार्याबाबत चर्चा देखील होणार आहे. दरम्यान रविवारी ते किंगडाओच्या महापौरांची सदिच्छा भेट घेतील. गुरूवारी झेंगझाऊ भेटी वेळी मुख्यमंत्री फॉक्सकॉन उद्योगाच्या उत्पादन केंद्राला भेट देणार असून त्यानंतर फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गौ आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील. बीजिंग येथील फोरममधील सहभागानंतर मुख्यमंत्री फडणवीस बैकी फोटॉनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिनयू वांग यांची भेट घेतील.
या दौऱ्यात मुख्यमंत्री झेंगझाऊ, बीजिंग, डुंगहाँग, चिंगडाओ येथील विविध औद्योगिक बैठकांमध्ये सहभागी होतील. या दरम्यान अधिकाधिक उद्योग, कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक होऊन मेक इन महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रयत्नशील असणार आहेत. सोमवारी हेअर उद्योग समूहाबरोबर चर्चा करतील. त्यानंतर महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्री सहभागी होतील. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर हेही सहभागी होणार आहेत.