आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: मुख्यमंत्र्यांचं स्पेशल गिफ्ट, 'हनुमान चालिसा अन‌् ग्रीटिंग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अाज वाढदिवस. त्यांचे असंख्य चाहते, अधिकारी अादी मंडळींनी ‘साहेबांना’ काही ना काही तरी गिफ्ट देण्याचे नियाेजन केले असेलच. मात्र फडणवीसांची सहावर्षीय कन्या दिविजाने बाबांचा वाढदिवस कसा साजरा करणार, याची माहिती दिलीय फक्त ‘दिव्य मराठी डाॅट काॅम’ला !

बाबांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ‘वर्षा’ बंगल्याच्या दिवाणखान्यात सोफ्यावर पेपर आणि मोठी रंगपेटी घेऊन दिविजा ग्रीटिंग बनवत बसली होती. या ग्रीटिंग कार्डचं गुपित सांगताना दिविजा म्हणाली, ‘मी असंच एक ग्रीटिंग फादर्स डेला बनवून बाबांना दिलं होतं. काय माहिती कुठे गेलं? म्हणून मग पुन्हा बनवून देतेय. एवढंच नाही, मी जमवलेल्या पैशांतून मी बाबांसाठी हनुमान चालिसा पण आणलाय. कारण मला माहितेय, माझं ग्रीटिंग त्यांच्यासोबत नाही राहणार, पण हनुमान चालिसा राहील. बाबांना हनुमान चालिसा वाचायला खूप आवडते.’ केशरी किनार असलेला हिरव्या रंगाचा ‘आऊल’(घुबड) तिने ग्रीटिंग कार्डवर काढला हाेता. त्यावर ‘हॅपी बर्डे बाबू’ असं लिहिलंही गेलं होतं. ‘घुबडाचं चित्र का बनवलंस?’ या प्रश्नावर दिविजा म्हणाली,‘बाबांना घुबड आवडतं. आणि मला पण काढायला आवडतं.’

‘मी नागपूरला असताना, बोन्साय नावाच्या दुकानामध्ये मी अन् बाबा जायचो. तिथे आम्ही खूप बार्बी घेतल्यात. आत्ताच आम्ही दोघं आणि आई डिस्नेलँडला जाऊन आलो. तिथे मिकी माऊस पण पाहिला. अॅक्च्युअली छोटा भीम माझा फेव्हरेट आहे. पण तिथे तो नव्हता ना, मग तिथला मिकी माऊस मला आवडला,’ असे ती हसतमुखाने सांगते. गप्पा मारता मारता दिविजाने दुसरं चित्रही पूर्ण केलं. त्याला ती ‘बाबांसाठी बनवलेलं स्पेशल ड्रॉइंग’ असं म्हणते. त्यानंतर घरभर हसत खेळत ती अाम्हाला राधा-कृष्णाच्या मूर्तीकडे घेऊन गेली आणि कृष्णासारखी पोझ देऊन मस्त फोटोही काढून घेत हाेती.

बिग बींची फॅन
‘मला अमिताभ बच्चन खूप आवडतात,’ असे सांगतानाच दिविजा अापण भूतनाथ रिटर्न्स आणि पिकू हे दोन सिनेमे पाहिल्याचेही सांगते. नुकत्याच एका कार्यक्रमात बाबांसोबत भेटल्यावर तिने आता बिग बींना घरी जेवायला येण्याचं आमंत्रणही दिलंय.
बातम्या आणखी आहेत...