आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिसेंबर २०१८ पर्यंत राज्य डिजिटल होणार : मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम महाराष्ट्र करत असून त्याचाच एक भाग म्हणून सेवा हमी कायद्यांतर्गंत असलेल्या १६३ सेवा ऑनलाइन करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. त्यामुळे राज्यात एकंदर ३६९ सेवा ऑनलाइन झाल्या असून २०१८ पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिले डिजिटल राज्य होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आॅनलाइन सेवा लोकार्पण सोहळ्यात दिली.

फडणवीस म्हणाले, सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाइन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून या अंतर्गत राज्यातील नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे. आतापर्यंत २४ विभागांच्या ३६९ सेवा सर्वसामान्यांना आता घरबसल्या घेता येतील. नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज, तक्रारी करता येणार आहेत.
स्मार्ट सिटीप्रमाणेच २९ हजार ग्रामपंचायती डिसेंबर २०१८ पर्यंत स्मार्ट करणार आहोत. डिजिटल सेवा गावापर्यंत पोहाेचवण्यासाठी प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र उभारण्यात येईल. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शेतकऱ्यांना हवामान, शेतमालाचा भाव व शेतीविषयक अन्य बाबींची माहिती तत्काळ मिळणार आहे. यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मालासाठी डिजिटल मार्केट निर्माण होणार असून मोठ्या प्रमाणावर शेती व शेतीपूरक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागपूर पहिला डिजिटल जिल्हा
राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून नागपूरची घोषणा रविवारी करण्यात आली. त्या अंतर्गत नागपूरच्या डोंगरगावच्या नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. डोंगरगाव ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित असलेल्या महिला बचत गटाच्या सदस्यांशी ऑनलाइन चर्चा केली. या वेळी तेथे उपस्थित असलेले नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

३६९ सेवा आॅनलाइन
सेवा हमी कायद्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात दिनांक २ ऑक्टोबर २०१५ रोजी ४७ सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात दिनांक २६ जानेवारी २०१६ रोजी १०९, तिसऱ्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०१६ रोजी ५० सेवा आॅनलाइन करण्यात आल्या. चौथ्या टप्प्यातील ऊर्वरित १६३ ऑनलाइन सेवा आज ऑनलाइन झाल्या. त्यामुळे राज्याच्या एकूण ३६९ सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...