आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis And Industries Minister Subhash Desai Inaugurates The 17 Th BruhanMaharashtra Mandal At Los Angeles

अमेरिकेतील मराठी बांधवांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यावे- मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे 17 वे अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई. - Divya Marathi
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे 17 वे अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई.
लॉस एन्जेलिस- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून त्यात अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजविलेल्या मराठी मंडळींनी योगदान दिल्यास महाराष्ट्र हे एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉस एन्जेलिस (अमेरिका) येथील मराठीजनांना केले. अमेरिकेतील मराठी बांधवांशी महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे 17 वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ पदाधिकारी शैलेश शेट्ये, विवेक रणदिवे आदी उपस्थित होते.
अमेरिकेतील मराठी मंडळींनी केलेल्या प्रगतीची विशेष प्रशंसा करुन मुख्यमंत्री म्हणाले, परकीय भूमीवर कर्तबगारी गाजविण्याचे मोठे काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांबद्दल राज्याला आनंद, समाधान आणि अभिमान वाटतो. अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा लक्षणीय वाटा आहे. कर्तृत्व गाजविण्यासोबतच येथील मराठी माणसाच्या या पिढीने आपले मराठीपण निष्ठने जोपासले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून राज्य आता वेगाने बदलत असल्याची माहिती या अधिवेशनातील मराठीजनांना देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेक इन इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मेक इन महाराष्ट्र आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. मेक इन महाराष्ट्र हा आमचा केवळ एक नारा नाही, तर ती एक व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे, ते देण्याचे काम आमचे सरकार करत आहे. राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन होत असून ‘रेड टेप’ ऐवजी ‘रेड कार्पेट’ संस्कृती आम्ही प्रस्थापित करीत आहोत. औद्योगिक क्षेत्रातील परवानाराज आम्ही संपुष्टात आणले आहे. यासोबत जलयुक्त शिवार अभियानासारख्या कार्यक्रमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. या विकासयात्रेत मराठी मंडळींनी सहभागी व्हावे. त्यांच्या योगदानातून महाराष्ट्र एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारुपास येईल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पुढे आणखी पाहा, अमेरिकेतील मराठमोळा सोहळा छायाचित्राच्या माध्यमातून...