आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज चुकत असल्याने हवामान विभागावर मुख्यमंत्रीही नाराज; नियाेजनाचा बाेजवारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हवामान विभागाने गेल्या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता, मात्र हा अंदाज शंभर टक्के खरा ठरला नाही.  गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हवामान विभागाचा चांगल्या पावसाचा अंदाज खोटा ठरल्याने आणि चुकीच्या अंदाजामुळे सरकारलाही नुकसान सोसावे लागत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 

२९ ऑगस्टला मुंबई आणि परिसरात ३०० मिमी पाऊस झाला होता. यामुळे रस्ते तुंबल्याने लोकल सेवेसह रस्ते वाहतूक ठप्प झाली. कार्यालये, शाळा लवकर सोडण्यात आल्या. हवामान विभागाने पुढील २४ तासांत म्हणजेच ३० ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यामुळे सरकारने शाळा महाविद्यालयांसह अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली, पण दुसऱ्या दिवशी फारसा पाऊसच पडला नाही. दिवसभर चांगले ऊन होते. हवामान विभागाच्या या चुकीच्या अंदाजामुळे सरकारच्या कामकाजावर परिणाम झाल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजीचे पत्र भूविज्ञान मंत्रालयाला नुकतेच पाठवले. या पत्रात हवामान मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे की, ‘हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी व सरकार आपापल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेत असतात. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला नाही. यंदाही तशीच परिस्थिती दिसत आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली. त्यानंतर हवामान विभागाने दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली. शाळा- महाविद्यालयांनाही सुटी जाहीर करण्यात आली.  मात्र, दुसऱ्या दिवशी पाऊसच पडला नाही आणि दिवसभर चक्क ऊन पडले होते. सुटी दिल्यामुळे सरकारी कामाचे नुकसान झाले,’ असे पत्रात नमूद करून हवामान विभागाने अंदाज योग्य व्यक्त करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे.  
 
बीडच्या शेतकऱ्याची पहिली तक्रार
जुलै महिन्यात बीडच्या माजलगाव तालुक्यातील शेतकरी गंगाभीषण थावरे यांनी पुणे आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याचा दावा करत वेधशाळेविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली हाेती. अशा प्रकारची तक्रार दाखल केली जाण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.
 
अधिकाऱ्यांचे माैन  
मुख्यमंत्र्यांच्या नाराजी व्यक्त करणाऱ्या पत्राबाबत मुंबईतील वेधशाळेच्या अधिकाऱ्यांशी ‘दिव्य मराठी’ने सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एका अधिकाऱ्याने आमच्याकडे पत्र आलेले नाही आणि आम्हाला या पत्राबाबत काहीही माहिती नाही, असे सांगत पटकन फोन ठेवून दिला.
 
पवारांनीही वाटली साखर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हवामान विभागाचा पावसाचा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर पाठवू, असे उपराेधिकपणे म्हटले होते. त्यांनाही अंदाज खोटेच ठरतात याची पूर्ण जाणीव असल्यानेच त्यांनी हवामान खात्यावर उपराेधिक टीका केली होती. मात्र, सुदैवाने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने त्यांनी खरोखरच साखरेचे पोते पुणे वेधशाळेला पाठवले होते.
 
विलासरावांनीही फटकारले हाेते हवामान विभागाला
‘हवामानातील बदलामुळे शेतकरी भरडला जात आहे. विकसित देशात हवामान खात्याकडून अचूक अंदाज वर्तविले जातात, मग आपल्याकडे अद्ययावत उपकरणे उपलब्ध असताना अंदाज कसे चुकतात? तुमच्या अंदाजावर लोक विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशा शब्दांत दिवंगत तत्कालिन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनीही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना फटकारले हाेते.मराठवाड्यात दर वर्षी अवकाळी पावसात वीज कोसळून चारशे लोकांचा बळी जातो. याबाबत पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा उभी करावी,’ अशी सूचनाही विलासरावांनी केली हाेती.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा.. 29 ऑगस्टच्या मुसळधार पावसाचा मुंबईवर काय झाला होता परिणाम...?
बातम्या आणखी आहेत...