आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरामय जीवनाची दृष्टी देणारा ‘योगाचार्य’ हरपला: मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- योगगुरू पद्‌मविभुषण बीकेएस अय्यंगार)
मुंबई- योगगुरू पद्‌मविभुषण बीकेएस अय्यंगार यांच्या निधनाने जागतिक स्तरावर योगविद्येचा प्रसार करताना माणसाला निरामय जीवनाची दृष्टी देणारा ‘योगाचार्य’ हरपला आहे. योगसाधना सहजसोप्या पद्धतीने सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, अय्यंगार यांनी योगासनाशी संबंधीत विविध पैलू आत्मसात करून त्यांचे सूक्ष्म अध्ययन केले. अत्यंत कमी वयात योगप्रसाराच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतांना त्यांनी योगप्रसाराचे कार्य पुणे येथून सुरू केले. योगशास्त्राशी संबंधीत संशोधन, लेखन आणि प्रशिक्षण अशा तीन स्तरावर त्यांनी बहुमोल कार्य केले. भारतीय संस्कृतीचा हा बहुमोल ठेवा त्यांनी जागतिक स्तरावरील जनतेपर्यंत पोहोचविला. अनेक मानसन्मान मिळाल्यानंतरही त्यांच्यातील अभ्यासकाचे आणि कुशल मार्गदर्शकाचे दर्शन त्यांच्या कार्यातून अखेरपर्यंत घडले. देश-परदेशातील नागरिकांना योगाचे धडे देण्यासाठी त्यांनी योग प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या निधनाने योगशास्त्र प्रसार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून केवळ देशच नव्हे तर संपुर्ण जग आदर्श योगाचार्याला मुकले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, जगभर योगाचा प्रचार-प्रसार करण्यात बहुमोल योगदान देणारे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या निधनाने चैतन्याचा झरा आटला आहे. योगासंदर्भातलं त्यांचं विपूल लेखन आपल्याला कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरेल. ते मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठीचं, तसंच सांस्कृतिक संचित आहे. अय्यंगार यांचं पुण्यातलं वास्तव्य ही सुद्धा एक प्रेरणादायी अनुभूती होती. त्यांच्या कार्यामुळे आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहील. बी. के. एस. अय्यंगार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, भारतातील योगशास्त्राचे पहिले ग्लोबल ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर असलेले पद्मभुषण योगाचार्य डॉ. बी के एस अय्यंगार यांचे निधन झाल्याचे समजले आणि अतिशय वाईट वाटले. गेल्या पाउणशे वर्षांपासून योगशास्त्राचा अभ्यास, प्रसार, प्रचार आणि अध्यापन ते करत होते. तसेच या विषयावरील अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. त्यांनी योगप्रचाराच्या निमित्ताने जगभर प्रवास केला. पण गुरूजींच्या चेहरयावरील सहज आणि सात्विक स्मित कायम असे. त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...