आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Fadanavis Say My Govt Complete Full Tenure, Good Relation Sena

शिवसेनेसोबत उत्तम संबंध, मंत्रिमंडळ विस्तार बिहार निकालानंतर- फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई- भाजप-शिवसेना युती सरकारला कोणताही धोका नाही. आमचे सरकार पाच वर्षाचा कालावधी निश्चितपणे पूर्ण करेल असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दिला. शिवसेना व आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत. आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी माझा नियमित संपर्क असतो, असे सांगत भाजप-शिवसेनेत सर्व काही ठीक आहे असे फडणवीसांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
मागील काही दिवसापासून शिवसेना-भाजपात दरी वाढत चालली आहे. शिवसेना भाजपला एकाही मुद्यावरून झोडपण्याची संधी दवडत नाहीये. भाजपही सेनेला मस्कापाणी लावत नाही. त्याची शिवसेनेला खंत व सल आहे. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी दगाफटका केल्यानंतर शिवसेनेला 25 टक्के सत्तेत वाटा दिला. आता कोल्हापूर व कल्याण-डोंबविली महापालिकेत भाजपने शिवसेनेशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने भाजप वरचढ ठरत आहे तर शिवसेनेला प्रत्येक ठिकाणी नमते घ्यावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना डिवचली जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप पक्षासह केंद्रातील राज्यातील सरकारला झोडपून काढले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांत कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. भाजपचे काही आमदार शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढावे अशी गळ घालत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपचे सरकार फार दिवस टिकणार नाही अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या स्थैर्याबाबत कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचमुळे मुख्यमंत्र्यांना आपले सरकार पाच वर्षाचा कालावधी निश्चितपणे पूर्ण करेल असे सारखे सारखे सांगावे लागत आहे. मुख्यमंत्री गुरुवारी दिल्लीत गेले असता पत्रकारांनी छेडल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना आमचा आमचा सर्वात जुना सहकारी पक्ष आहे. सरकार म्हणून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नेहमीच सरकारमध्ये काम करताना सकारात्मक भूमिका घेतली आहे. करवाढीचा निर्णयही मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय होता. सरकारमध्ये शिवसेना व भाजपा एकदिलाने काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, हा स्थानिक पातळीवर व तेथील नेत्यांनी घेतलेला निर्णय असतो. जिथे गरज असते तेथे आम्ही एकत्र लढतो असे सांगत त्यांनी औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेचे उदाहरण दिले. आता कोल्हापूर, कल्याण-डोंबिवलीत युती झाली नाही. हा निर्णय त्या त्या वेळी व स्थानिक नेते घेतात. त्यामुळे आगामी मुंबई-पुणे आणि नागपूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती होईल हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.
घटक पक्षाचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागलेले आहेत. राजू शेट्टी, महादेव जानकर सत्तेतून बाहेर पडू असे सांगत आहेत. तुम्ही त्यांना शब्द दिला होता मात्र तुम्ही त्यांचा विश्वासघात करीत आहात काय? असा सवाल केला असता मुख्यमंत्र्यांनी आगामी बिहार विधानसभेच्या निकालानंतर म्हणजेच दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा मानस आहे, असे स्पष्ट केले.