आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरसंघचालक इफेक्ट; मातंग समाजासाठी २५ हजार घरकुले, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/मुंबई - पंधरा दिवसांपूर्वी जाहीर सभेत दिलेला शब्द पूर्ण करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातंग समाजाच्या वेदना आणि दु:ख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याचा परिणामही लगेच दिसून अाला. अनुसूचित जातीसाठी बांधण्यात येणाऱ्या पावणेदाेन लाख घरांपैकी २५ हजार घरे मातंग समाजातील गरजूंना देण्यात येतील, असा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात अाला.
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशीसंदर्भात अाढावा घेण्यासाठी मुंबईत या बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

२३ जून राेजी अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टतर्फे नागपुरात आयोजित चिंतन शिबिरात ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अशोक भावे, आमदार सुधाकर भालेराव, लहानू इंगळे आदींनी मातंग समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले होते. त्यावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातंग समाजाच्या वेदना व दु:ख सरकारमधील स्वयंसेवकांच्या कानावर घालण्याचे अाश्वासन दिले हाेते. यानंतर मागील अाठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरसंघचालकांची भेट घेतली हाेती तेव्हा भागवत यांनी हा विषय त्यांच्या कानी घातला अाणि काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन मातंग समाजहिताच्या घाेषणा केल्या.
‘संघ संपूर्ण हिंदू समाज एक म्हणून पाहतो. पाणी, देऊळ आणि स्मशान सर्व हिंदूंना समान असावे याकरिता संघ प्रयत्न करीत आहे. याला थोडा वेळ द्यावा लागेल. पण हाही बदल निश्चितच होईल,’ असा शब्दही भागवतांनी त्या वेळी दिला हाेता. त्यानुसार गावातील सर्व समाजासाठी एकच स्मशानभूमी असावी, याबाबतचा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने २ अाॅक्टाेबरच्या विशेष ग्रामसभेत घेऊन ताे स्मशानभूमीच्या दर्शनी भागात लावावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अाढावा बैठकीत केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या घाेषणा
> अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत मातंग समाजासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, या योजना समाजापर्यंत पोहोचत नाहीत. या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने योजनांची माहिती, त्याची अंमलबजावणी करणारे कार्यालय व अधिकारी यांची माहिती असलेले पुस्तक प्रसिद्ध करून ते समाजापर्यंत पोहोचवावे. त्यासाठी या योजना समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी राज्य शासनास मदत करावी.
> डॉ. आंबेडकर सामूहिक प्रोत्साहन योजनेत वैयक्तिक उद्योग उभ्या करणाऱ्या मातंग तरुणांनाही लाभ मिळणार आहे. मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या कालबाह्य शिफारशी वगळून अंमलबजावणी योग्य शिफारशींची यादी तयार करावी व त्यावर भर द्यावा. या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल.
>लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची दोन महिन्यांत पुनर्रचना करावी. तसेच मातंग समाजातील लोकांच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रभावी योजना महामंडळामार्फत राबविण्यात याव्यात. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील महिलांचे जास्तीत जास्त बचत उभारण्यासाठी महामंडळाने पुढाकार घ्यावा.
>अनुसूचित जातीतील मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाचे पब्लिक स्कूल उभारावे. त्यामध्ये मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. या समाजातील जास्तीत जास्त मुलांनी शाळेत यावे यासाठी महामंडळामार्फत विशेष योजना राबविण्यात यावी. तसेच निवासी आश्रमशाळांमध्ये केंद्रीकृत स्वयंपाकगृहाद्वारे भोजन पुरवठा करावा.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...