आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Fadanvis Said Controversy About Sabnis Should Be Stopped

साहित्य संमेलन : मुख्यमंत्री म्हणाले वादावर पडदा टाका, भाजपचा विरोधही मावळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता; परंतु त्यांनी आता माफी मागितली असल्याने सर्व वादांवर पडदा टाकला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. दरम्यान, बुधवारी मंत्रालयात पत्रकारांनी ‘संमेलनाला तुम्ही जाणार का?’ असा प्रश्न केला तेव्हा फडणवीस म्हणाले ’मी जाणार नाही असे कधीही म्हटले नव्हते. जो काही वाद झाला तो आता संपला आहे आणि वाद संपलाही पाहिजे.’
संमेलनात आता नवीन वाद, विधाने नकोतच,
पुणे - साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी वादग्रस्त वक्तव्यांविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे वादावर आता पडदा पडला आहे. त्यांच्या बोलण्याची भाषा आणि लिखित व्यवहार यात तफावत असली, तरी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या पवित्र व्यासपीठाचा व्यापक विचार करून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, मात्र संमेलनादरम्यान वा नंतर सबनीस यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यास वैचारिक लढा सुरूच राहील, अशा शब्दांत खासदार अमर साबळे यांनी बुधवारी या वादावर पडदा टाकला.

साबळे यांच्यासह भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या साहित्य संमेलनाला भाजपचा कधीच विरोध नव्हता. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण आणू नये, ही सीमारेषा भाजपने पाळली. मात्र, त्यांनी प्रसिद्धीसाठी पंतप्रधानांविरोधात अपशब्द वापरले. त्यामुळे पक्ष म्हणून भूमिका घेणे आवश्यक होते. ती आम्ही घेतली. गावोगाव फिरून हे भाषणे करतात, पण मग पंतप्रधानांचे पत्र इतके दिवस गुप्त का ठेवले? या पत्रातील दिलगिरीची भाषाही संदिग्ध आहे. तरीही आम्ही या वादावर तूर्तास पडदा टाकत आहोत. यापुढे संमेलन सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून सबनीस यांचीच आहे. त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे; पण भान राखून त्यांनी बोलावे एवढीच अपेक्षा आहे, असे भंडारी म्हणाले.