आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जुलैअखेरपर्यंतची डेडलाइन, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अहमदनगर- बीड- परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली या राज्यातील नवीन रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादन जुलैअखेरपर्यंत पूर्ण करून ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी.
 
या रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे काम गतिमान होईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते.   
 
मुख्यमंत्री म्हणाले की, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गांसाठी भूसंपादन अखेरच्या टप्प्यात अाले आहे. उर्वरित भूसंपादन येत्या जुलैअखेर पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात या रेल्वे मार्गांची कामे सुरू करण्यात यावीत. जयगड बंदर रेल्वेशी जोडण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या मार्गाचे काम तसेच चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात यावे, असे निर्देश या वेळी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहेत.
 
जळगावबाबतही अाढावा   
बेलापूर-सीवूड्स-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाणपुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथील अतिक्रमणे, पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गाची निर्मिती, एमयूटीपी टप्पा दोन तसेच टप्पा तीनमधील विविध कामे, ईएमयू कोचेस तसेच एसी कोचेस, मुंबई तसेच राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, सीएसटी- पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, विरार- वसई रोड- पनवेल सबअर्बन कॉरिडॉर, वांद्रे-विरार एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे- लोणावळ्यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची निर्मिती, जळगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न, आर्वी-वरूडदरम्यान नवीन मार्गाचे सर्वेक्षण करणे, कोकण रेल्वेच्या रोहा-वीर दरम्यान ट्रॅक डबलिंग करणे, डीडीसीसीआयएलएल प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या कामांचाही मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांकडून आढावा घेण्यात आला.  

कसारा स्थानकाच्या बाहेर बसस्थानक  
मुंबई उपनगर परिसरातील अनेक प्रवासी कसारा रेल्वे स्थानकावर उतरून तेथून पुढे वाहनाने नाशिक, शिर्डी, अहमदनगर इत्यादी ठिकाणी जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कसारा उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी महामंडळाचे बसस्थानक उभारल्यास प्रवाशांची मोठी सोय होऊ शकेल.
 
यासाठी रेल्वेने एसटी महामंडळाला जागा द्यावी, अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या बदल्यात नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ एसटी महामंडळाची जागा रेल्वेला हस्तांतरित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात तातडीने पडताळणी करून निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश रेल्वे मंत्री प्रभू यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

दीड हजार काेटींची कामे : प्रभू  
प्रभू म्हणाले की, महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मुंबईसह राज्यात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरू आहेत. या विविध प्रकल्पांसंदर्भात रेल्वे आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या संपादनाचे काम जलदगतीने करण्यात यावे. त्यानंतर रेल्वे विभागाकडे जमिनीचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित कामाच्या निविदा प्रसिद्ध करणे, प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू करणे आदी कामांना रेल्वे विभागाने गती द्यावी, असे निर्देश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.  
 
बातम्या आणखी आहेत...