आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीतील अन्यायकारक अट रद्द; उमेदवारांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पोलिस भरती प्रक्रियेत एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज भरलेल्या 15 पोलीस शिपायांना अपात्र ठरविणारा पोलीस प्रशासनाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरविला असून या शिपायांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच पोलीस भरती प्रक्रियेतील एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज भरल्यास अपात्र ठरविण्याची अट रद्द करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
भरती प्रक्रियेतील अटी व शर्तींनुसार एकापेक्षा जास्त घटकांमध्ये भरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे या शिपायांना सेवामुक्त करण्याचे आदेश नागपूर पोलिस प्रशासनाने यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात दिले होते. मात्र, आपण दोन घटकांमध्ये अर्ज केले असले तरी केवळ एका ठिकाणीच नोकरी स्वीकारली आहे. त्यामुळे आपणास पुन्हा सेवेत घ्यावे, अशी विनंती या पोलीस शिपायांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. केवळ एकापेक्षा जास्त घटकात अर्ज करण्याची या शिपायांची चूक ही फारशी गंभीर नसून भरतीबाबतचे सर्व प्रशिक्षण आणि इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर अत्यंत किरकोळ स्वरुपाच्या चुकीसाठी या शिपायांना सेवेतून काढून टाकणे योग्य नसल्याचे मत त्यांनी नोंदविले आणि या उमेदवारांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले. यासोबतच अशा स्वरुपाची अटच भरती प्रक्रियेच्या नियमांमधून रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी गृह विभागास दिले आहेत. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उमेदवारांमध्ये राजेंद्र भगत, निलेश गोडेकर, सितेश चौरसिया, सहदेव चिखले, सचिन कनोजिया, प्रशांत भोयर, निलकमल इंगोले, कोमल बोरकर, राधिका पाचवे, मुकेश श्रीपाद, मोहनकुमार भोलाप्रसाद, लक्ष्मी शरानागत, काजल वर्मा, मयुरी येरपुडे आणि सरिता खतेल यांचा समावेश आहे. शासनातर्फे 2014 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस भरतीत या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त घटकांमध्ये भाग घेतल्याने त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...